Mumbra Railway Accident : 'किती मुंबईकरांचा जीव घेणार? तुमचा टार्गेट किती आहे?' प्रवासी संघटनेचा रेल्वे प्रशासनावर संताप

मुंबईत बारापैकी दहा महिने उकाडा असतो. त्यामुळे दारं बंद केली तर आतील प्रवासी गुदमरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला. सकाळी 9 ते 9.30 दरम्यान कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेने मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसारा-सीएसएमटी लोकल आणि सीएसएमटी ते कर्जत लोकलमधील प्रवासी एकमेकांवर आदळल्याने तब्बल 11 प्रवासी खाली कोसळले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. 

या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मोठं पाऊल उचललं. लोकलचे दरवाजे आपोआप बंद होतील, असा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला. नवीनसह जुन्या लोकलला गेट क्लोजर सिस्टम लागू करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र या निर्णयावर सर्वच पातळीवरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Mumbra Railway Accident : मुंब्रा लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी प्रवाशांची यादी आली समोर

तर प्रवासी गुदमरून मरतील...

उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या लता अरगडे यांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. हवं तर सर्व लोकल एसी कराव्यात. मात्र सर्वसाधारण लोकलची दार बंद करण्याचा निर्णय घेतला तर प्रवाशांसाठी त्रासदायक ठरेल. मुंबईत बारापैकी दहा महिने उकाडा असतो. त्यामुळे दारं बंद केली तर आतील प्रवासी गुदमरतील. त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने 100 टक्के एसी ट्रेन कराव्यात. आणि सर्वसामान्यांना परवडतील असे तिकीट दर ठेवावेत. अधिकाऱ्यांना पंचतारांकित सोई दिल्या जातात. मात्र सर्वसामान्यांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. किंवा सध्याचे एसीचे दर कमी करावेत. सध्या राज्य सरकार पैसे वाटत आहे. सर्वसामान्यांचा जीव वाचविण्यासाठी पैसे खर्च का केले जात नाहीत. यापूर्वीही रेल्वे प्रशासनाला आम्ही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. कल्याणच्या पुढचे पर्यायी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत असंही लता यावेळी म्हणाल्या. 

Advertisement

तुमचा टार्गेट कितीचा आहे? किती मुंबईकरांचा जीव घेणार

मुंबईत एसी लोकल येण्यापूर्वी प्रवाशी संघटना आणि रेल्वे प्रशासनामध्ये बैठक झाली होती. आम्ही त्यावेळीही एसी लोकलचं स्वागत केलं होतं. मात्र सामान्य लोकलच्या वेळेत एसी लोकल ठेऊ नका असं सर्वांचं म्हणणं होतं. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाकडून सामान्य लोकल ऐवजी एसी लोकल चालवली जात असल्याने दोन लोकलमधील गर्दी एकाच लोकलमध्ये येते. त्यामुळे गर्दी थेट दुपट्टीने वाढते. रेल्वेने डोकं ठिकाण्यावर ठेऊन निर्णय घ्यावेत. लोकांचा अंत पाहू नका. तुमचा टार्गेट कितीचा आहे. किती मुंबईकरांचा जीव घेणार, असा सवाल मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.