Chiplun News: चिपळूणमध्ये जंगलातून लोकवस्तीत आली एक रहस्यमय आकृती! कॅमेऱ्यात फोटो कैद, सत्य समजताच सगळेच थक्क

Chiplun News: कोकणातील चिपळूण शहरात अतिशय दुर्मीळ घटना घडली, यामुळे स्थानिक देखील थक्क झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Chiplun News: चिपळूणमध्ये दिसली अद्भुत आकृती, रहस्य काय?"
NDTV Marathi

- राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Chiplun News: निसर्गरम्य कोकण आणि विशेषतः चिपळूण परिसरातील जंगल ही नेहमीच विविध वन्यजीवांसाठी सुरक्षित आश्रयस्थान राहिली आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, देशातील अत्यंत दुर्मीळ आणि आकाराने सर्वात लहान असलेले 'माऊस डियर' (Indian chevrotain) थेट चिपळूण शहरात लोकवस्तीजवळ आढळून आले आहे. चिपळूणमधील डी.बी.जे. महाविद्यालय (DBJ College) परिसरातील रहिवासी बाळकृष्ण पालकर यांच्या घरामागील भागात या हरणाचे दर्शन झाले.

रहस्यमय आकृती! चिपळूणमध्ये नेमके काय घडले?

शांत असलेल्या डी.बी.जे. कॉलेज परिसरात बाळकृष्ण पालकर यांच्या घरामागे अचानक एक वेगळाच प्राणी दिसून आला. नेहमीच्या प्राण्यांपेक्षा वेगळा आणि लहान आकाराचा हा प्राणी असल्याचे लक्षात येताच पालकर यांनी त्याचे फोटो काढले. हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून अत्यंत लाजाळू आणि दुर्मीळ समजला जाणारा 'माऊस डियर' होता. काही वेळ या परिसरात वावरल्यानंतर मानवी चाहूल लागताच हे हरिण जवळच असलेल्या डोंगराच्या दिशेने वेगाने निघून गेले.

Advertisement

निशाचर आणि लाजाळू स्वभावाचा प्राणी

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, 'माऊस डियर' हा अतिशय लाजाळू आणि प्रामुख्याने निशाचर (रात्रीच्या वेळी वावरणारा) प्राणी आहे. तो दिवसा खूपच क्वचित बाहेर पडतो आणि दाट झाडाझुडपांमध्ये स्वतःला लपवून ठेवतो. त्याचा आकार साधारणपणे एखाद्या मांजर किंवा सशाएवढा लहान असतो.  

(नक्की वाचा : प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम)

'माऊस डियर'चे यापूर्वीही झाले होते दर्शन

चिपळूणमध्ये या दुर्मीळ प्राण्याची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही डॉ. विक्रम घाणेकर यांना चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात या दुर्मीळ 'माऊस डियर'चे दर्शन झाले होते. त्यामुळे चिपळूण शहराच्या सभोवताली असलेल्या डोंगराळ आणि जंगल भागात या प्रजातीचे अस्तित्व टिकून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

चिपळूणच्या समृद्ध जैवविविधतेवर शिक्कामोर्तब

शहरीकरणाचा वेग वाढत असतानाही चिपळूणमध्ये अशा दुर्मीळ वन्यजीवांचे वास्तव्य असणे, ही येथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी या घटनेबाबत आनंद व्यक्त केला आहे. अशा दुर्मीळ वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. पालकर यांनी टिपलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर आणि वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात प्रचंड व्हायरल होत असून कौतुकाचा विषय ठरत आहे.