जाहिरात

प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम

प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या 'क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'ने केली आहे. हा एल निनो डिसेंबर महिन्यापर्यंत अतितीव्र पातळी गाठणार असून, 1950 नंतरचा हा सर्वात तीव्र एल निनो असण्याची शक्यता 63 टक्के आहे.

प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम

अजिंक्य धायगुडे, पुणे

मान्सूनवर आता एका मोठ्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढल्यामुळे तिथे आता 'एल निनो'ची स्थिती पूर्णपणे सक्रिय झाली आहे. अमेरिकेची नामांकित हवामानशास्त्र संस्था 'नोआ' (NOAA) च्या 'क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'ने (CPC) गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे महासागरातील 'न्यूट्रल' म्हणजेच तटस्थ स्थिती आता संपुष्टात आली आहे.

1950 नंतरचा सर्वात मोठा धोका

'सीपीसी'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा एल निनो आगामी काळात अधिक मजबूत होत जाईल आणि डिसेंबर 2026 पर्यंत तो 'अतितीव्र पातळी गाठेल. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हा एल निनो ऐतिहासिक ठरू शकतो. वर्ष 1950 पासून नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आणि तीव्र एल निनो असण्याची शक्यता 63 टक्के इतकी जास्त आहे.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

भारतातील पर्जन्यमानासाठी धोक्याची घंटा

भारतात चालू वर्षाच्या मान्सूनचे आगमन होत असतानाच दुसरीकडे एल निनो सक्रिय होणे ही देशाच्या एकूण पावसासाठी अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. मॉन्सूनची पुढील प्रगती आणि संपूर्ण हंगामातील पावसाचे प्रमाण यावर आता थेट एल निनोचा नकारात्मक प्रभाव पडणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढणार 

हवामान तज्ज्ञांच्या मते, या एल निनोच्या प्रभावामुळे पाठोपाठ येणारा 2027 चा उन्हाळा कमालीचा तीव्र असेल. देशात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढेल. एवढेच नव्हे तर, या स्थितीमुळे पुढील वर्षाच्या म्हणजेच 2027 च्या मॉन्सूनचे भारतातील आगमन देखील नेहमीपेक्षा उशिराने होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com