Chicken mutton shop closed: येत्या स्वातंत्र दिनी म्हणजे 15 ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिने त्या दिवशी कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. तो थांबताना दिसत नाही. तोच आता राज्यातील आणखी दोन शहरात तशाच पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे. त्या पाठोपाठ असाच निर्णय मालेगाव महापालिकेनेही घेतला आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यत आहे.
नागपूर महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती निमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील असे आदेश दिले आहेत. असे आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी काढले आहेत. आदेशात नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील असे नमूद केले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली त्यानंतर नागपूर महापालिकेने हा निर्णय घेतला. त्यात आता नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेची ही भर पडली आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील कत्तल खाने,मांस,मटण विक्रीची दुकानें बंद ठेवण्याचा आदेश आयुक्त रवींद्र जाधव यांनी काढला आहे. त्यामुळे मांस,मच्छी खवय्यांची काहीशी अडचण होणार आहे. स्वातंत्र्य दिनाबरोबरच श्रीकृष्ण जयंती, जैन पयुर्षण पर्व, गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी या दिवशीही मांस, मटण विक्रीचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सर्वात आधी असा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतले. त्याच पडसाद शहरात उमटले. विरोधी पक्षांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शिवाय हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. कोणत्या दिवशी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही बंदी घालणारे कोण असा प्रश्न विरोधकांनी केडीएमसी प्रशासनाला केला. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर कल्याण डोंबिवली महापालिके समोर मांस विक्रीची दुकाने थाटू असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता मालेगाव आणि नागपूर महापालिकेनेही हा निर्णय घेतला आहे.