सोशल मीडियावर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे किंवा खोट्या वैभवाचा देखावा करणे किती महागात पडू शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसवर एआयच्या मदतीने तयार केलेले पैशांचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घरी तब्बल साडेआठ लाखांची चोरी झाली. मात्र, स्टेटसवर दिसलेल्या रकमेच्या तुलनेत घरात कमी पैसे मिळाल्याने चोराचा भ्रमनिरास झाला आणि त्याने थेट पीडिताकडे 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. या संपूर्ण प्रकरणात नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
एआय व्हिडिओ ठरले गुन्ह्याचे कारण
नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील रहिवासी समीर याचलवार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे भासवणारे व्हिडिओ पोस्ट करत होते. पोलिस तपासात समोर आले की, हे व्हिडिओ त्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले होते.
(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)
मात्र, त्यांचे हे स्टेटस पाहून समीर यांचे परिचित श्रेयस बोरकर याला समीर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा समज झाला. पैशांच्या हव्यासापोटी श्रेयसने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने समीर यांच्या घरात घरफोडी आणि खंडणीचा एक मोठा कट रचला.
साडेआठ लाखांची चोरी अन् चोराचा भ्रमनिरास
समीर कामावर गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी समीर यांची पत्नी आणि मुले घरात झोपलेली असतानाच आरोपींनी घरातून साडेचार लाख रुपयांचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. परंतु, व्हॉट्सअॅप स्टेटसवर कोट्यवधींचे व्हिडिओ पाहिल्यामुळे चोरांना घरात यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात फक्त साडेआठ लाख रुपये हाती आल्याने मुख्य आरोपी श्रेयस बोरकर याचा भ्रमनिरास झाला.
मोबाईल ट्रॅकरचा वापर आणि 40 लाखांची खंडणी
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपींनी समीर यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करून 40 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांच्या मुलांचे अपहरण करून पत्नी आणि मुलांना जीवे मारण्याची थेट धमकी श्रेयसने दिली. पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. समीर यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी त्यांच्या दुचाकीमध्ये सायलेंट मोडवर एक मोबाईल फोन लपवून ठेवला होता. या लपवलेल्या मोबाईलच्या लोकेशनवरून समीर कधी घरातून बाहेर पडतात आणि कधी येतात, याची अचूक माहिती आरोपींना मिळत होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी चोरीची वेळ निश्चित केली होती.
(नक्की वाचा- Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी गजाआड
बेलतरोडी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये एक आरोपी घरातून बॅगा बाहेर फेकताना स्पष्ट दिसला. तसेच त्यांनी वापरलेल्या कारचा क्रमांकही पोलिसांच्या हाती लागला. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी श्रेयस बोरकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.