Nagpur News : पु. ल. देशपांडेंच्या सूनबाईंनी शोधला घन कचरा व्यवस्थापनाचा उपाय ! नागपूर पॅटर्नची देशभर चर्चा

Nagpur News : नागपूरच्या दैनंदिन घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

नागपूरच्या दैनंदिन घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विदेशी तंत्रज्ञानावर आधारित एका वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन होणार  आहे.  या तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिलाच प्रकल्प असेल.  नागपूरमधील दैनंदिन 1200 मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पानंतर कानपूर येथील 1500 टन क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल. त्यानंतर बेंगळुरू तसेच भारतातील एकूण अकरा शहरांत अशा प्रकल्पांची अंमलबजावणी होईल, त्यामुळे भारतीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्वारे  (अर्बन लोकल बॉडीज) होणाऱ्या शहरी घन कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडलेला दिसून येईल असा विश्वास हे तंत्रज्ञान भारतात आणणाऱ्या वृंदा ठाकूर  यांनी व्यक्त केला.

काय आहे प्रकल्प?

“कचरा डंपिंग यार्ड किंवा कचरा प्रक्रिया प्रकल्प म्हणजे प्रदूषण आणि विशेषतः दुर्गंध असे एक समीकरण झाले आहे. मात्र, या तंत्रज्ञानामुळे हवा, पाणी किंवा जमिनीवर कुठलेही प्रदूषण होणार नाही. शिवाय कचरा वेचणाऱ्या ‘रॅग पिकर्स' पासून ते इतर आवश्यक कामांसाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.” 

Advertisement

वृंदा ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  “मुंबईतील सुगंध आणि चव क्षेत्रात 102 वर्षांची परंपरा असलेल्या KEVA (केवा) ग्रुपचे अध्यक्ष केदार वझे हे आमच्या नागपूर प्रकल्पाचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी आमच्या भावी पिढ्यांच्या भल्यासाठी या उदात्त कार्यात हातभार लावला आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्थानीय स्वराज्य संस्थेच्या करातून एक पैसाही या प्रकल्पासाठी लागणार नाही. त्यामुळे आधीच ताण असलेल्या त्यांच्या अर्थसंकल्पावर कोणताही परिणाम होणार नाही आणि नागपूरकरांवर नवीन करांचा भारही पडणार नाही.''

Advertisement

( नक्की वाचा : Stray Dogs: नागपूरमध्ये 10 पट वाढली भटक्या कुत्र्यांची संख्या, कोर्टाच्या आदेशानंतरही का बदलली नाही परिस्थिती? )

कोण आहेत वृंदा ठाकूर?

हा प्रकल्प भारतात आणणाऱ्या वृंदा ठाकुर या मूळच्या मुंबईत वाढलेल्या भारतीय त्या पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे यांच्या त्या सुनबाई आहेत. गेली चाळीस वर्षे त्या नेदरलँड्समध्ये वास्तव्यास आहेत. त्या तेथील नागरिक आणि भारतासाठी एन आर आय (NRI) आहेत. 

Advertisement

त्यांचा विषय रसायनशास्त्र. असला तरी त्या सांगतात, “काही वर्षांपूर्वी भारतात आले असताना मुंबईच्या देवनार परिसरातील भीषण अग्निकांड घडले आणि मी हादरून गेले. त्या घटनेने मला अंतर्मुख केले.  मन हेलावून गेले. त्यानंतर मी भारतातील म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शहरी घन कचरा व्यवस्थापन यावर उपाय शोधण्याचा निर्धार केला. ही समस्या कशी सोडवता येईल, ज्यातून सर्वांना लाभ होईल याचा विचार सुरू केला. दोन वर्षे याचाच सखोल अभ्यास केला आणि नेदरलँड्समध्ये अशा घटना का घडत नाहीत हेही पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानात यशस्वी केलेले असतांना, या तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण मायदेशाची सेवा करू शकतो, असे सातत्याने वाटत होते, केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची बायोफ्युएल विषयक दूरदृष्टी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी आमचे तंत्रज्ञान ऐकून आम्हाला प्रोत्साहन दिले.”

या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

सध्या नागपूर शहरातून दररोज सुमारे 1200 मेट्रिक टन घनकचरा गोळा केला जातो. या संपूर्ण कचऱ्याचे आवश्यक तेथे विलगीकरण करून त्यावर प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार असून त्यातून सुमारे 25 टन वाहतुकीचे इंधन म्हणून वापरण्यास योग्य गॅस, खते आणि नैसर्गिक कोळशाचा पर्याय ठरू शकणाऱे RDF ब्रिकेट्स अशी तीन उत्पादने मिळतील. 

“येत्या नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प सुरू होईल आणि पुढील तीस वर्षांची नागपूरकरांची कचऱ्याची समस्या यातून सुटेल,” असा विश्वास वृंदा ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )

खरेतर, आज भारतातील इतर शहरांप्रमाणे नागपूरमध्येही शहरी घनकचरा ही एक गंभीर समस्या बनली आहे. भांडेवाडी येथील कचऱ्याच्या डंपिंग यार्ड परिसरात आधीच साठलेले प्रचंड कचऱ्याचे ढीग बायो-मायनिंग प्रक्रियेने कमी करण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिका करत आहे. काही प्रमाणात त्याला यशही मिळाले आहे. जुने ढिगारे (legacy waste dump) संपून जागा पुन्हा परत मिळविण्याचे दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी देखील होताना दिसत आहेत. अशावेळी, कचऱ्याने शहरी प्रदूषणात भर पडू नये आणि भविष्यात घन कचऱ्याचे नवे ढिगारे होऊच नयेत, असे स्वच्छ भारत मिशन 2.0 चे उद्दिष्ट साकार होण्यासाठी हे तंत्रज्ञान आशादायी आहे, हे नक्की.

Topics mentioned in this article