Naigaon BDD Chawl Redevelopment: मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नायगावमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाने आज (सोमवार, 16 मार्च) एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अनेक दशकांपासून केवळ 160 ते 180 स्क्वेअर फुटांच्या चिंचोळ्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो मराठी कुटुंबांचे नशिब आज उजळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला'तील तब्बल 864 पुनर्वसन फ्लॅटचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या एका खोलीत आयुष्य काढले, त्यांना आता थेट 2 BHK घरांचा ताबा मिळाला असून, मुंबईच्या मध्यवस्तीत हक्काचे आणि मोफत मोठे घर मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे मुंबईतील चाळ संस्कृतीतून थेट आधुनिक टॉवर संस्कृतीत प्रवेश करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
वन रूम किचन ते टू बीएचके
नायगाव बीडीडी चाळीतील हा पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांसाठी खऱ्या अर्थाने लॉटरी ठरला आहे. यापूर्वी हे रहिवासी अत्यंत छोट्या म्हणजे 160 ते 180 चौरस फुटांच्या घरात राहत होते. मात्र, आता राज्य सरकारने त्यांना चक्क 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेली प्रशस्त 2 BHK घरं उपलब्ध करून दिली आहेत.
( नक्की वाचा : Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर आता ट्रॅफिक विसरा! 1 जूनला काय घडणार? वाचा सविस्तर )
घराचा आकार पूर्वीपेक्षा जवळपास तिप्पट झाला असून, यासाठी रहिवाशांकडून कोणताही अतिरिक्त खर्च घेण्यात आलेला नाही. हे संपूर्ण अपग्रेडेशन राज्य सरकारमार्फत मोफत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ताबा मिळालेल्या 864 रहिवाशांमध्ये 423 पोलीस कर्मचारी, निवृत्त पोलीस आणि त्यांच्या वारसांचा समावेश आहे.
नायगाव बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती, हक्काच्या घराचे स्वप्न साकार! 🏘️
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2026
🔸 Handover of 864 flats of the Naigaon BDD Chawl Redevelopment Project, 'Dr. Babasaheb Ambedkar BDD Sankul' at the hands of CM Devendra Fadnavis.
Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Assembly… pic.twitter.com/JteV1zt0co
काय आहे नेमका प्रकल्प?
नायगावमधील या प्रकल्पात एकूण 42 चाळी असून तिथे 3344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. म्हाडाच्या (MHADA) माध्यमातून या पुनर्विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण आराखड्यानुसार येथे 23 मजल्यांचे एकूण 20 आलिशान टॉवर्स उभारले जाणार आहेत.
विशेष म्हणजे या एकूण जागेपैकी 65% जागा ही केवळ मूळ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1401 रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी 20 पैकी 5 इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 15 इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिल 2026 पर्यंत आणखी 537 घरं बांधून पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Ambernath News: अंबरनाथमध्ये महायुतीत ठिणगी, आमदारांनी पाठवलेल्या गुढ्या भाजपा नगरसेवकांकडून परत, कारण काय? )
मुंबईतील चाळ पुनर्विकासाचा मोठा टप्पा
केवळ नायगावच नव्हे, तर वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचाही या मोठ्या पुनर्विकास मोहिमेत समावेश आहे. एकूण 195 चाळींमधील 15,593 रहिवाशांचे पुनर्वसन या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #BDDChawlRedevelopment #HousingForAll pic.twitter.com/DTMy7rAf5F
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2026
जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि असुरक्षित चाळींच्या जागी आता आधुनिक सोयीसुविधांनी युक्त टॉवर्स उभे राहत आहेत. यामध्ये बहुसंख्य मराठी कुटुंबांचा समावेश असल्याने मुंबईतील मराठी माणसाला शहराबाहेर न जाता त्याच ठिकाणी हक्काचे आणि मोठे घर देण्याचे सरकारचे धोरण यशस्वी होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world