नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात बेकायदेशीर गर्भपाताच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अत्यंत गोपनीयरीत्या 'स्टिंग ऑपरेशन' करून हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.
आचोळे परिसरातील 'केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये बेकायदेशीरपणे गर्भपात केला जात असल्याची माहिती वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरोग्य विभागाने एक डमी ग्राहक पाठवून स्टिंग ऑपरेशन केले आणि हा सर्व गैरप्रकार पुराव्यासह पकडला.
अशा प्रकारे झाला पर्दाफाश
आरोग्य विभागाने पाठवलेल्या डमी रुग्णाने गर्भपाताची चौकशी केली असता, हॉस्पिटलमध्ये कोणतीही वैध परवानगी नसतानाही गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींकडे यासाठी आवश्यक असलेली वैधानिक पात्रता किंवा शैक्षणिक अधिकार नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
(नक्की वाचा- Solapur News: भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र; दोन्ही राष्ट्रवादीही सोबत)
या डॉक्टरांवर झाली कारवाई
या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात तीन प्रमुख व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. चंद्रकांत मिश्रा (संचालक, केअर अँड क्युअर हॉस्पिटल), अरुण शुक्ला, डॉ. संजीव सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)
रुग्णालयाकडे 'एमटीपी' कायद्यांतर्गत गर्भपातासाठी आवश्यक असलेले परवाने नव्हते. तरीही पैशांच्या हव्यासापोटी हा गंभीर गुन्हा केला जात होता. आचोळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि संबंधित वैद्यकीय कायद्यांनुसार या तिघांवर गुन्हे दाखल केले असून, अधिक तपास सुरू आहे.