प्रांजल कुलकर्णी
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदांकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका विभागीय अधिकाऱ्याविरोधात 20 हून अधिक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली नाही. बाहेर महिला सुरक्षित नाहीत पण सरकारी कार्यालयातही महिला सुरक्षित नसल्याच भयावह चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. अशातच नाशिकमध्ये चक्क जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. एका विभागीय अधिकाऱ्याविरोधात एक दोन नाही तर तब्बल 20 हून अधिक महिलांनी तक्रारी केल्या आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून विशाखा समितीकडे देण्यात आली होती. दरम्यान ही बातमी जिल्हा परिषदेत वाऱ्यासारखी पसरली आणि एक एक करत तक्रारदार महिलांचा आकडा जवळपास 20 च्या वर जाऊन पोहोचला.
कामाचा धाक हा अधिकारी दाखवत होता. शिवाय त्या बरोबर तो काही आमिष ही या महिला कर्मचाऱ्यांना देत होता. त्या माध्यामातून लैंगिक छळा बरोबर मानसिक छळ ही करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून तपास सुरू करण्यात आला असून काही महिलांनी पुराव्यानिशी तक्रार केल्याचीही जिल्हा परिषदेत चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासोबतच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. विशाखा समितीच्या चौकशीत आता काय समोर येतय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात एका अधिकाऱ्याला जरी लक्ष करण्यात येत असले तरी मात्र एकूण तिन अधिकाऱ्यांविरोधात महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केली असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे राजकारण तापले असून अधिकाऱ्यांमधली स्पर्धा समोर आली आहे. मात्र राजकारण करताना महिलांचा अशाप्रकारे वापर केला जात असेल तर ही खेदजनक बाब असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, अशी मागणी ही आता होत आहे. एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. वर्षानूवर्षे एकाच खुर्चीवर अधिकारी कोणाच्या वरदहस्ताने बसले आहेत ? थेट महिलांचा छळ करेपर्यंत त्यांचं धाडस कसं जाऊन पोहोचतं ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून महिला छळाच्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जाऊन पोहोचतो याकडे सर्वाचं लक्ष लागल आहे.