Nashik News: 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा विक्रीचा डाव, गुजरात कनेक्शन आलं समोर, सत्य समोर येताच...

“शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळा विक्रीचा प्रकार
  • शाळेच्या विक्रीसाठी गुजरातमध्ये मुक्तारपत्र तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे
  • शाळा विक्री विरोधात विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

निलेश वाघ

जिल्हा परिषद शाळांमधून आज ही हजारो विद्यार्थी शिकत आहे. इथं आज ही दर्जेदार शिक्षण दिलं जातं. महाग होत असलेल्या शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळा सर्व सामान्यांसाठी मोठा आधार वाटतात. अशी स्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळाच विक्रीचा प्रकार समोर आला आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचं ही या प्रकारात समोर आलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांसह पालक ही आक्रमक झाले होते. त्यानंतर प्रशासनाचे याकडे लक्ष गेले.  

या सर्व विक्री प्रकरणात गुजरात कनेक्शन ही समोर आलं आहे. शाळेच्या विक्रीसाठी गुजरात राज्यात मुक्तारपत्र तयार करण्यात आलं. या माध्यमातून विंचूर येथील शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित खरेदीदाराने शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारा विरोधात शाळेचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. 

नक्की वाचा - Nashik Viral: 'या' गावात भूताचा संचार? सर्वत्र भीतीचे वातावरण, भूताचे फोटो झपाट्याने Viral

“शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही विक्री प्रक्रीया रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. या प्रकरणाची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणात लक्ष द्यायचे आदेश दिले. शिलाय भुजबळांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आंदोलनातून परत शाळेत पाठवण्यात आले. 

मात्र,संबंधित नोंद अधिकृतरीत्या रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनामुळे नाशिक- छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्या सोबत खेळले जात असल्याचा आरोप ही यावेळी गावकऱ्यांनी केला आहे.  

Advertisement