प्रांजल कुलकर्णी
पवित्र अशा श्रावण महिन्यातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. सलगच्या सुट्टयांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भविक दाखल झाले आहेत. अशा वेळी मंदिराच्या सुरक्षारक्षकांच्या घोळक्याने एका भाविकाला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. अशा वेळी या सुरक्षारक्षकांवर कारवाई ऐवजी मंदिर संस्थान त्यांना पाठीशी घालत असल्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरची ओळख आहे. कुंभमेळ्याचे देखील हे स्थान असल्याने भाविकांचा मोठा ओढा इथे बघायला मिळतो. सध्या तर स्वातंत्र्यदिन आणि विकेंड अशा सलग तिन दिवस सुट्ट्या आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. अशातच शनिवारी दुपारी एक संतापजनक प्रकार बघायला मिळाला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केली. काही भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य चित्रित केली आहेत. सुरक्षारक्षकांच 5-6 जणांचं एक टोळकच भाविकाला मारहाण करत असल्याचं यात बघायला मिळत आहे. या घटनेनंतर भाविक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. लाखो भाविक येणार असल्याचं माहीत असतांना देखिल मंदिर संस्थानने योग्य नियोजन का केले नाही ? असा ते प्रश्न उपस्थित करत आहेत.
सलगच्या सुट्ट्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी मंदिर संस्थानने मुख दर्शन सुरू केले होते. मात्र अचानक मुख दर्शन बंद केल्याने रांगेत उभे असलेले भाविक संतप्त झाले होते. भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. याच वादातून या सुरक्षारक्षकांनी थेट कायदाच हातात घेतला. दरम्यान या मारहाण प्रकरणी मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी अजब स्पष्टीकरण दिले असून भाविकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला असं त्यांनी सांगत सुरक्षारक्षकांनी कोणतीही मारहाण केली नसून फक्त झटापट झाली असाही असा दावा केला आहे.
काही अतीउत्साही भाविकांकडून त्र्यंबक मंदिराच्या बारीकेंडिंग तोडून उत्तर प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असं विश्वस्तांचे म्हणणे आहे. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी समजावूनही ते रांग सोडून जायला ऐकण्यास तयार नव्हते. बाहेर काढल्यावर अधिक गोंधळ आणि घोषणाबाजी करत सुरक्षारक्षकावर हल्ला केला असं ही ते म्हणाले. झटापट वाढल्याने एम एस एफ रक्षकांना बरीकेडींग पासून दूर करण्यासाठी भाविकांना सक्तीने दूर करावे लागले. ही झटापटीची दृश्ये चित्रित करून प्रशासनाविरोधात मानसिकता तयार केली जाते असं ही ते म्हणाले.
Pune News: पुणेकरांनो सावध व्हा! तुमच्यावर असणार आहे आता फिरत्या कॅमेऱ्याची नजर
काही दिवसांपूर्वीच व्हीआयपी दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही दलालांना अटक केली होती यासोबतच सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचे अनेक प्रकार आजवर इथे समोर आल्याने त्रंबकेश्वर संस्थानचा कारभार सुधारणार तरी कधी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा घटनांमुळे देशभरातील भाविकांमध्ये त्र्यंबकेश्वरचे नाव बदनाम तर होणार नाही ना ? हा देखिल संस्थानने विचार करणे गरजेचे आहे.