विशाल पाटील, प्रतिनिधी
NCMC Smart Card Details : महिला,ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड- NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कार्डची नोंदणी करून ते सक्रिय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार,राज्यात आतापर्यंत जवळपास 51 लाख नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे.त्यापैकी जवळपास 25 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांनीही लवकर प्रक्रिया पूर्ण करावी,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी केंद्रावर जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी
एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण आणि नोंदणी प्रक्रिया राज्यभरातील जवळपास 4 हजारांहून अधिक अधिकृत केंद्रांवर सुरू आहे. या केंद्रांवर कार्ड मिळविणे, नोंदणी करणे तसेच कार्ड सक्रिय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता जवळच्या केंद्रावर जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Pune News: देशातील सर्वात मोठा स्कॉलरशिप उपक्रम, 506 विद्यार्थिनींचा गौरव, 'या' संस्थेकडून 400 कोटींची तरतूद
कार्ड वितरण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली आहे.विहित शुल्कापेक्षा जास्त दर आकारून NCMC स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचा परवाना रद्द केला जाईल,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.1 ऑगस्टपूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते सक्रिय करावे.जेणेकरून प्रवास सवलतींचा लाभ अखंडपणे मिळू शकेल,असे प्रशासनाने म्हटले आहे.
एनसीएमसी (NCMC) कार्ड म्हणजे काय?
एनसीएमसी कार्ड म्हणजे राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड.हे एक स्मार्ट कार्ड असून विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकाच कार्डचा वापर करता येतो.तसच एसटी बस प्रवासासाठी हे कार्ड उपयुक्त आहे.मेट्रो,स्थानिक रेल्वे,बस सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूकीतही याचा वापर करू शकता. सुविधा उपलब्ध होऊ शकते.
नक्की वाचा >> Electric Car: पहिल्यांदाच हायब्रिड लूकमध्ये दिसणार सर्वांची आवडती 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये करणार 400 km पार
प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम किंवा वेगवेगळ्या पासची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत नाही. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रवास सवलतींची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवता येते.महाराष्ट्रात महिला,ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्डचा वापर करण्यात येत आहे.त्यामुळे 1 ऑगस्टपासून संबंधित लाभार्थ्यांसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.