Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या प्रवाशांचा विमान प्रवास आता केवळ वेगवानच नाही, तर अत्यंत चवदार आणि शाही थाटात होणार आहे. आगामी हिवाळी वेळापत्रक म्हणजेच विंटर शेड्युल 2026-27 चा आनंद द्विगुणित करण्यासाठी विमानतळ परिसरातच देशातील अग्रगण्य विमान केटरिंग कंपनी ताजसॅट्सचे अत्याधुनिक फ्लाईट किचन दिमाखात सज्ज झाले आहे. 25 ऑक्टोबर 2026 ते 27 मार्च 2027 या कालावधीत लागू होणाऱ्या या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना आकाशात झेपावल्यानंतरही त्यांच्या आवडीनुसार गरम आणि चवदार भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
दररोज 15,000 जेवण बनवण्याची क्षमता
अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या भव्य किचनमधून सध्या दररोज 40 पेक्षा जास्त विमानांना ताज्या अन्नपदार्थांचा पुरवठा केला जात आहे. सध्या दररोज 7,500 जेवण बनवण्याची क्षमता असलेल्या या युनिटचा विस्तार विमानांची संख्या वाढल्यास सहजपणे दररोज 15,000 जेवणांपर्यंत केला जाऊ शकतो. यामुळे देशी-विदेशी प्रवाशांना आरोग्याची पूर्ण काळजी घेणारे आणि त्यांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ थेट विमानातच उपलब्ध होतील.
आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळणार मोठा फायदा
परदेशातून भारतात येणाऱ्या किंवा इथून उड्डाण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी ही सुविधा अत्यंत मोलाची ठरणार आहे. सध्या भारतात येणाऱ्या सुमारे 40 टक्के आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या मूळ देशातूनच विमानामध्ये अन्न साठवून आणतात.
मात्र, आता नवी मुंबईतच हे जागतिक दर्जाचे किचन सुरू झाल्याने विमान कंपन्यांना स्थानिक पातळीवरूनच ताजा, उच्च दर्जाचा अन्नपुरवठा उचलण्याचा एक उत्तम पर्याय मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अधिकारी सुभाष मुरिकेंचेरी यांनी सांगितले की, या सुविधेमुळे विमान कंपन्यांना प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करणे सोपे जाईल.
जागतिक सुरक्षा मानके आणि विविधता
हे नवीन केटरिंग युनिट अन्न सुरक्षेच्या बाबतीत हॅसप, आयएसओ 22000 आणि एफएसएसएआय या सर्व सर्वोच्च संस्थांच्या नियमांचे काटेकोर पालन करते. अन्न तयार करण्यापासून ते योग्य तापमानात साठवणूक आणि विमानांपर्यंत सुरक्षित वाहतुकीवर आधुनिक तंत्रज्ञानाने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. येथे शाकाहारी, मांसाहारी, ॲलर्जी-मुक्त आणि हलाल अशा विविध प्रकारच्या स्वादिष्ट भोजनाची विशेष सोय असेल.
अदाणी समूह आणि ताजसॅट्सची नवी भरारी
विमान क्षेत्रातील खाद्य पुरवठ्याचा 4 दशकांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या ताजसॅट्सने मुंबईनंतर आता नवी मुंबई विमानतळावरही आपली मोहोर उमटवली आहे. अदाणी समूहाच्या नवी मुंबई विमानतळाला जागतिक स्तरावर नेण्याच्या ध्येयात या नव्या फ्लाईट किचनमुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.