Navi Mumbai Airport FedEx Cargo Hub : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आता केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर जागतिक व्यापारासाठीही एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या फेडएक्सने या विमानतळावर आपल्या संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी केली आहे. या प्रकल्पासाठी फेडएक्सने 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या विकासामुळे भारताचा जागतिक व्यापारातील दबदबा वाढणार असून पश्चिम भारतासाठी हे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि भव्य विस्तार
हा नवीन एअर कार्गो हब सुमारे 300,000 चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेला असेल. हे केंद्र पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे, ज्यामुळे मालाची हाताळणी अत्यंत वेगाने आणि अचूकपणे करणे शक्य होईल.
हा हब भारताला दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख बाजारपेठांशी थेट जोडण्याचे काम करेल. विशेष म्हणजे, हा प्रकल्प अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) यांच्या भागीदारीतून साकारला जात आहे.
( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
हजारो हातांना मिळणार काम
या प्रकल्पामुळे केवळ व्यापारच वाढणार नाही, तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. हा हब पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवा क्षेत्रांमध्ये 6,000 पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत पायाभरणी समारंभ
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम, रिचर्ड स्मिथ, कामी विश्वनाथन आणि अदानी समूहाचे जीत अदानी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्राची जागतिक लॉजिस्टिक्स नकाशावरील ओळख अधिक गडद होणार आहे.
व्यापाराला मिळणार नवी गती
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, एनएमआयए हे जवाहरलाल नेहरू बंदर आणि औद्योगिक कॉरिडॉरच्या जवळ असल्याने निर्यातीला मोठा पाठबळ मिळेल. तर फेडएक्स एमईआयएसएच्या अध्यक्ष कामी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, या हबमुळे ग्राहकांना जलद गती आणि कार्यक्षमता मिळेल. प्रगत सॉर्टिंग सिस्टम, हाय-स्पीड स्क्रीनिंग आणि खास एअरक्राफ्ट पार्किंग बेज यांसारख्या सुविधांमुळे औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनियरिंग वस्तूंची वाहतूक करणे अधिक सोपे होईल.
भविष्यातील मोठी झेप
एनएमआयएच्या कार्गो केंद्राची सुरुवात वार्षिक 0.5 मिलियन मेट्रिक टन क्षमतेने होईल, जी भविष्यात टप्प्याटप्प्याने 3.25 मिलियन मेट्रिक टनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) आपली उत्पादने जागतिक स्तरावर नेण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळात मोठी संधी उपलब्ध होणार आहे.