Navi Mumbai: 'ध्रुवतारा जेट्टी' अपघातांचा हॉटस्पॉट; दुचाकीसह 2 तरुण खाडीत कोसळले, एकजण बेपत्ता

Navi Mumbai Accident: दुर्दैवाने, बेलापूरची ही ध्रुवतारा जेट्टी अपघातांसाठी 'ब्लॅक स्पॉट' बनली आहे. या परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारचे जीवघेणे अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईतील बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टीवर आज, शनिवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. दुचाकीवरून जात असलेले 2 तरुण थेट खाडीमध्ये कोसळले. या अपघातात एका तरुणाला सुखरूप वाचवण्यात यश आले असले तरी, कार्तिक उगले नावाचा दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे.

या घटनेनंतर नवी मुंबई सागरी पोलिसांकडून बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी तातडीने मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साधारण 6.30 वाजताच्या सुमारास घडला. कोल्हापूर पासिंगची दुचाकी घेऊन दोन तरुण या जेट्टीवरून प्रवास करत होते. मात्र, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट खोल खाडीच्या पाण्यात कोसळली.

या दुर्घटनेत दुचाकीवर असलेला कार्तिक उगले हा तरुण पाण्यात बेपत्ता झाला आहे. सुदैवाने, त्याच्यासोबत असलेला मित्र वेळीच बाहेर आला. वाचवण्यात आलेल्या तरुणाने त्वरित अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघातानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सागरी पोलिसांचे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन

अपघात होऊन 3 तास उलटून गेले असले तरी बेपत्ता झालेला तरुण कार्तिक उगले याचा अद्याप कोणताही मागोवा लागलेला नाही. नवी मुंबई सागरी पोलीस या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. या शोधकार्यासाठी स्थानिक गोताखोर, अनुभवी मासेमार आणि विशेष रेस्क्यू टीम यांची मदत घेतली जात आहे. कार्तिकला लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र खाडीतील पाण्याचा प्रवाह आणि गाळामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे ध्रुवतारा जेट्टी परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

'ध्रुवतारा जेट्टी' अपघातांचे हॉटस्पॉट

दुर्दैवाने, बेलापूरची ही ध्रुवतारा जेट्टी अपघातांसाठी 'ब्लॅक स्पॉट' बनली आहे. या परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारचे जीवघेणे अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे.

साधारण 1 महिन्यापूर्वी याच जेट्टी परिसरात एका महिलेची ऑडी कार चुकीच्या मार्गाने खाडीत शिरली होती. त्यावेळी सागरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या महिलेचे प्राण वाचवले होते.

Advertisement

जवळपास 2 महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यात एक वाहन खाडीत कोसळले होते.

वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे या जेट्टीवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड्स आणि योग्य सुरक्षा चिन्हे लावावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Topics mentioned in this article