सूरज कसबे
ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत आणि आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून कार्ल्याची एकवीरा देवी ओळखली जाते. याच देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक गर्दी करतात. या वर्षी सुमारे 7 ते 8 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून एकवीरा देवी ट्रस्टने जय्यत तयारी ही केली आहे. ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सुलभ शौचालये, वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था, अन्नदानाचा प्रसाद आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य व्यवस्थेचा समावेश आहे. संपूर्ण उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24 तास लक्ष ठेवले जात आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी गडावर जाताना दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या आहेत. अचानक पाऊस आल्यास भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी या ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत. सध्या मंदिर पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. परंतु भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळता येणार आहे. शिवाय भाविकांना सहज आणि लवकर दर्शन मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिले आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. यामुळे हलक्या वाहनांना आणि भाविकांना गडावर पोहोचणे सोपे होणार आहे. एकवीरा देवीचा हा नवरात्र उत्सव केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक सलोख्याचे आणि एकजुटीचे प्रतीक बनला आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेमुळे या उत्सवाला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कर्ल्याच्या एकविरा देवीचे भक्त संपूर्ण भारतात आहेत. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी आहे. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. त्यामुळे नवरात्रात या गडावर खास कार्यक्रमांची रेलचेल असते. पुजाआर्चा होत असतात. भाविकांना भक्तीसागर इथं लोटलेला या नऊ दिवसात दिसतो. एक भक्तीमय वातावरण या नऊ दिवसात इथं अनुभवायला भेटतं. त्यामुळे लांबून भाविक इथं दर्शनसाठी येत असतात.