बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आल्याचं या फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होत होते. विरोधी पक्ष, अंजली दमानिया, मनोज जरांगे यांनी आधीपासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र संतोष देशमुख यांच्या छळाचे फोटो समोर आल्यानंतर आज मोठी घडामोड होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...
संतोष देशमुखांचा हत्या कशी झाली?
मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी खिदीखिदी हसत आहे. कोणी व्हिडीओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत.