NDTV Emerging Business Conclave : "उद्धवजींची अवस्था पाहता महायुतीचा विजय पक्का"; आशिष शेलारांचा निशाणा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या विलंबामुळे मुंबईकरांना नगरसेवकांशिवाय राहावे लागत आहे आणि याचे 'पाप' उबाठा सेनेचे आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

जाहिरात
Read Time: 2 mins

NDTV Emerging Business Conclave : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय पक्का आहे, असा दावा भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीला झालेल्या विलंबासाठी शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जबाबदार धरले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीटीव्ही मराठीच्या 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली.

आशिष शेलार यांनी उबाठा सेनेवर  निशाणा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या विलंबामुळे मुंबईकरांना नगरसेवकांशिवाय राहावे लागत आहे आणि याचे 'पाप' उबाठा सेनेचे आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले. त्यांनी आरोप केला की, 'शिवसेना ठाकरे गटाने गैरमागण्या करून गोंधळ घातला आणि हे प्रकरण न्यायालयात अडकवले.'

(नक्की वाचा-  NDTV Emerging Business: मुंबईत AI विद्यापीठ स्थापण करणार, आशिष शेलारांनी दिली माहिती)

आता न्यायालयानेच निवडणुका घेण्याबाबत घोषणा केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे शेलार यांनी स्पष्ट केले. राज्यातील राजकीय स्थितीबद्दल बोलताना त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

उद्धव ठाकरे आज दारोदारी फिरत आहेत

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला एकत्र यायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न असल्याचे शेलार म्हणाले. मात्र, ‘मुंबई आमचीच' अशा घोषणा देणारे उद्धव ठाकरे आज काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत शिवतीर्थावर जात आहेत. त्यामुळे उद्धवजी आणि त्यांचा पक्ष दारोदारी फिरताना दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली. यावरून आगामी निवडणुकांचा निकाल स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

आपल्या मतांबद्दल आत्मविश्वास गमावलेले लोक आज मराठी अमराठी वाद घालत आहे. आम्ही मराठी भाषेचे कट्टर आहोत. मात्र हिंदुस्थानी भाषांचे विरोधक आम्ही नाहीत. म्हणून अन्य भाषिकांची पंगा घ्यायचा म्हणजेच मराठी माणसांना भुलवण्याचा त्यांचा प्रयत्ना आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.