NDTV Emerging Business: महाराष्ट्रातील संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम साधून प्रगती कशी साधता येईल, यावर सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच भविष्यवेधी तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला. एनडीटीव्ही मराठीने आयोजित केलेल्या 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
आशिष शेलार यांनी राज्याच्या विकासासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले - एक म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे आणि दुसरे म्हणजे नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. दोन्ही खात्यांमधील आपले काम प्रभावीपणे पुढे नेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाविषयी बोलताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहेत. हा महाराष्ट्रासाठी एक मोठा अभिमानाचा क्षण आहे. तसेच, लिलावात निघालेली रघुजीराजे भोसले यांची तलवार आपण परत आणू शकलो आणि ती आता आपल्या मालकीची झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
याचप्रमाणे, महाराष्ट्राची 'वारी' ही जगासाठी कुतूहलाचा विषय बनली आहे. त्यामुळे या वारीची जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील काही सण, उत्सव, लोककला आणि लोकवाद्ये लुप्त होत आहेत, त्यांना पुन्हा लोकांसमोर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
'एआय फॉर महाराष्ट्र'
सांस्कृतिक वारशासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याचा विकास साधण्याचे धोरणही सरकारने आखले आहे. 'ड्रोन दीदी' हा पंतप्रधानांनी प्रस्तावित केलेला उपक्रम असून, त्याचा आता प्रभावीपणे उपयोग होत आहे. ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर संरक्षणातही होत असून, ड्रोन इंडस्ट्री महाराष्ट्रात आणण्यासाठी धोरण तयार केले आहे, ज्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.
याशिवाय, जगाची भाषा 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' (AI) झाली आहे, असे सांगत त्यांनी AI चे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, रोजगार निर्मिती, प्रशासन आणि इतर कोणत्याही विभागात AI चा उपयोग करण्यासाठी ‘एआय फॉर महाराष्ट्र' हे धोरण आणले जात आहे. हे धोरण विविध खात्यांच्या प्रतिक्रिया घेऊन मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.
मुंबईत येणार एआय विद्यापीठ
रोजगार आणि मनुष्यबळावर बोलताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, नवी तंत्रज्ञान आले की नवीन रोजगाराच्या संधीही येतात. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तयार केले पाहिजे. यासाठी खासगी कंपन्यांचे अभ्यासक्रम वापरून तरुणांना ‘एआय फ्रेंडली' मनुष्यबळ म्हणून तयार केले जाईल. यासाठी मुंबईमध्ये ‘एआय विद्यापीठ' (AI University) आणत असल्याची घोषणाही त्यांनी केली.