New Khambatki Ghat Tunnel Update 2026 : पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटातील तो धोकादायक प्रवास आणि तासनतास चालणारी वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. या नवीन प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून प्रवासाचा दर्जाही सुधारणार आहे.
प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून 7 मिनिटांवर
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खंबाटकी घाट बोगद्याच्या डाव्या बाजूची लेन आता चाचणी तत्त्वावर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे खंबाटकी घाट पार करण्यासाठी लागणारा 45 मिनिटांचा वेळ आता केवळ 7 मिनिटांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांची तब्बल 38 मिनिटांची बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये 1.3 किमी लांबीचा बोगदा आणि 1.2 किमी लांबीच्या व्हायाडक्टचा समावेश आहे. यामुळे घाटातील वळणावळणाचा रस्ता मागे पडून वाहनधारकांना थेट आणि वेगवान मार्ग उपलब्ध झाला आहे.
धोकादायक एस वळणाचा अडथळा दूर
खंबाटकी घाटातील रस्ता हा अत्यंत अवघड आणि इंग्रजी एस अक्षराच्या आकाराचा होता. या तीव्र वळणामुळे या भागात अपघातांचे प्रमाण अत्यंत जास्त होते. जुना घाट रस्ता काही ठिकाणी अरुंद असल्याने वाहनांचा वेग मंदावत असे.
विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात या ठिकाणी किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असत. अवजड वाहनांना हे चढण पार करताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता या नवीन बोगद्यामुळे हा धोकादायक वळणाचा रस्ता टाळता येणार असून सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि पुढील उद्दिष्ट
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र मध्येच आलेल्या कोव्हिड 19 महामारीच्या संकटामुळे कामाचा वेग मंदावला आणि काही काळ काम थांबवावे लागले होते. खंबाटकी घाटात तीन-तीन लेनचे दोन बोगदे तयार करण्याचे नियोजन असून यासाठी मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सध्या डाव्या बाजूची ट्यूब चाचणीसाठी सुरू झाली असून, उजव्या बाजूची ट्यूब जून 2026 पर्यंत पूर्ण करून ती पूर्णपणे वाहतुकीसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट रस्ते विकास विभागाने ठेवले आहे.