भाजप आमदार नितेश राणे यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. नागपुरात रविवारी नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर मुंबई विविध ठिकाणी त्यांचे बॅनर्स लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न पत्रकारांना विचारला. त्यावर त्यांचं मन एवढं मोठं नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे यांनी म्हटलं की, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून शुभेच्छा येत आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मालकांचं मन एवढं मोठं नाही की मला शुभेच्छा देतील. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या किंवा मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना 39 वर्षांपासून ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नको. केवळ एवढीच इच्छा आहे की त्यांनी यापुढे नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं. सगळ्या गोष्टींवर आमचं बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं असताना कुणी वाकड्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रहार करायला तयार आहोत, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला.
(नक्की वाचा- "ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर)
निलेश राणे उत्तर देण्यास सक्षम
निलेश राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, निलेश राणे याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. ते देखील अनुभवी समाजसेवक आहेत. हा प्रश्न त्यांच्यासाठी राखीव ठेवा. तुम्हाला अपेक्षित उत्तर ते देतील.
(नक्की वाचा- "गांधी कुटुंबाने माझी कारकिर्द घडवली आणि बिघडवलीही", मणिशंकर अय्यर यांचं खळबळजनक वक्तव्य)
विरोधकांच्या EVM आंदोलनावर टीकास्त्र
विरोधकांच्या EVM विरोधी आंदोलनावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, लोकसभेच्यानंतर हे आंदोलन केलं असतं तर लोकांचा विश्वास बसला असता. वायनाडमधील कुठल्या पायऱ्या शोधून तिथे बसले असते तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहिती आहे, हे हिंदू द्वेशाचं राजकारण आहे. जेव्हा व्होट जिहाद झाला तेव्हा यांना काहीच वाटलं नाही. तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे. हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडलं, मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा यांना हिरव्या मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने बघत आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.