BMC Election News: मुंबई महापालिकेचा निकाल लागून चार दिवस उलटून गेले आहे आहे. भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र असं असूनही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र महापौर भाजपचाच बसेल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
भाजपला महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी शिवसेनेची गरज लागेल अशी चर्चा आहे. मात्र, या प्रक्रियेत एक महत्त्वाची कायदेशीर बाब म्हणजे, मुंबई महापालिका कायद्यात महापौर निवडीसाठी 114 या आकड्याची किंवा कोणत्याही 'मॅजिक फिगर'ची कायदेशीर अट नाही. ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ असेल, तो पक्ष अडीच वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौर निवडू शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर आणि उपमहापौर निवडीबाबत कायद्यात नेमकी काय तरतूद आहे, यावर एक नजर टाकूयात.
(नक्की वाचा- मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)
अधिनियमातील महत्त्वाची तरतूद
मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 37 नुसार, महापालिकेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीत, निवडून आलेल्या नगरसेवकांमधून एकाची 'महापौर' आणि दुसऱ्याची 'उपमहापौर' म्हणून निवड केली जाते. कायद्यानुसार महापौर निवडीसाठी 50 टक्क्यांहून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य नाही. सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांपैकी ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात, तो महापौर म्हणून घोषित केला जातो. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो.
(नक्की वाचा- BMC Top 10 Richest Corporators: श्रीमंत महापालिकेतील 'कुबेर'! टॉप 10 नगरसेवकांची कोट्यवधींची संपत्ती)
मॅजिक फिगर 114 कशासाठी?
ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी यांनी याबाबत सांगितलं की, मुंबई महापालिकेतील 114 ही मॅजिक फिगर कशा अर्थाने आहे हे समजून घ्यावं लागेल. सर्वात जास्त नगरसेवक असलेला पक्ष थेट महापौर पदावर दावा करू शकतो, तिथे मॅजिक फिगरची आवश्यकता नाही. मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेतील सभासदांची संख्या 227 आहे, तर त्याच्या निम्याहून अधिक 114 होतात. ज्यावेळी सभागृहात, वैधानिक समित्या, विशेष समित्यांमध्ये प्रस्ताव मांडतात आणि ते मंजुरीसाठी आणत असतात, त्यावेळी हा बहुमताचा आकडा आवश्यक असतो. म्हणजेच महापालिकेत प्रस्ताव मंजुरीसाठी निम्म्याहून अधिकचं संख्याबळ आवश्यक आहे. त्यावेळी तेवढे नगरसेवक सोबत असणे आवश्यक आहे. अशारितीने मॅजिक फिगर ही केवळ धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असते.