Ola Uber Strike: संपाने बळी घेतला, आर्थिक गणित कोलमडल्याने उबरचालकाने उचलले टोकाचे पाऊल

वसई, विरार, नालासोपारा शहरासह राज्यभर ओला, उबर चालकांचे मागील तीन दिवसांपासून भाडे वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यामुळे व्यवसाय ठप्प असल्याने चालकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

Ola Driver Suicide : ओला, उबर संपाच्या पार्श्वभूमीवर नैराश्येतून एका चालकाने टोकाचा निर्णय घेतला. नालासोपाराच्या बिलाल पाडा येथे राहणाऱ्या एका ओला उबर चालकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरोज सक्सेना वय 46 असे आत्महत्या केलेल्या ओला उबर चालकाचे नाव आहे. 

वसई, विरार, नालासोपारा शहरासह राज्यभर ओला, उबर चालकांचे मागील तीन दिवसांपासून भाडे वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यामुळे व्यवसाय ठप्प असल्याने चालकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. ओला उबर चालकांचे मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे, मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. शिवाय त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे ओला उबेर चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

ओला-उबर चालकांच्या संपाचा तिसरा दिवस

मुंबईमध्ये तीन दिवसांपासून आझाद मैदानात ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतत आहे.  यामध्ये बाईक टॅक्सीवर पूर्णपणे बंदी आणावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासोबत ठराविक भाडे ठरवावे, मीटर टॅक्सीप्रमाणे ओला उबेरला देखील भाडं मिळावं, कॅब आणि टॅक्सी चालक बोर्ड कार्यक्षम करावं या मागण्या आहेत. आपसातील स्पर्धा असल्याने मिळणारे दर कॅब चालक आणि मालकांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत. ॲप्स आपल्या ग्राहकांना जे डिस्काउंट्स देतात ते आमच्या जीवावर उदार होऊन देतात, असेही वाहन चालक मालकांचे म्हणणे आहे.

ओला, उबेर या ॲप्सद्वारे कॅब टॅक्सी चालवणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या संपाचं लोण आता राज्यभर पसरू लागले आहे. त्यामुळे राज्यात टॅक्सी कॅब चालक आणि मालक संघटित होत संपावर गेले आहेत.  अनेक ठिकाणी आता बुकिंग केल्यानंतर कॅब टॅक्सी मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही, त्यामुळे साहजिकच प्रवाशांची देखील अडचण होत आहे.  

Advertisement