मध्य रेल्वेवर एक मोठा ब्लॉक घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. शनिवारी 1 जूनला मध्यरात्रीपासून जवळपास 36 तासांचा हा मेगाब्लॉक घेतला जाईल. यात जवळपास 600 लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. हा ब्लॉक हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा आणि मेन लाईनला सीएसएमटी ते भायखळा दरम्यान घेण्यात येईल. याकाळात लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याचा लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इक्विपमेंट मास्ट्स, सिग्नलिय यंत्रणा, टेलिकम्युनिकेशनमध्ये येणारे अडथळे दुर करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. शिवाय अपग्रेडेशनच्या कामात रुट रिले इंटरलॉकिंगपासून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगपर्यंत ट्रॅकच्या कामाचा यात समावेश आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ब्लॉक घेण्याबाबत नियोजन करत आहेत. शनिवार 1 जूनला मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वडाळा ते सीएसएमटी आणि मेन लाईनवर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटी वरूनसुटणाऱ्या 100 लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी 60 टक्के गाड्यांवरही त्याचा थेट परिणाम होणार आहे.
हेही वाचा - राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर दररोज दिड हजार पेक्षा जास्त लोकल धावतात. त्यातील बऱ्याचश्या लोकल या सीएसएमटीतून सुटतात. सध्या सीएसएमटी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. फलाट क्रमांक 10 ते 14 चा विस्तार केला जातोय. इथून आता 24 डब्ब्यांच्या गाड्या सुटू शकतात. हे काम झाल्यानंतर प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता वीस टक्क्यांनी वाढणार आहे.
हेही वाचा - जन्मदात्यांनी मुलीची हत्या केली, मृतदेह परस्पर जाळला; आंतरजातीय विवाहाचं धक्कादायक वास्तव
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि प्रमुख टर्मिनस असलेल्या सीएसएमटी स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण आणि यार्ड नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 1 आणि 2 जूनला 36 तासांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे. या ब्लॉक दरम्यान मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.