मुंबईत मराठीत बोलण्याची मागणी गुन्हा? अंधेरी स्टेशनवर प्रवाशाला तासभर कोंडल्याचा धक्कादायक आरोप, पाहा VIDEO

Andheri Railway Station : : मुंबईतील लोकल रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेचा वापर आणि प्रवाशांना मिळणारी वागणूक हा विषय नेहमीच संवेदनशील राहिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Andheri Railway Station : या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई:

Andheri Railway Station : मुंबईतील लोकल रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेचा वापर आणि प्रवाशांना मिळणारी वागणूक हा विषय नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अशातच अंधेरी रेल्वे स्थानकावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून एका मराठी प्रवाशाला तब्बल 1 तास खोलीत बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप रेल्वेच्या तिकीट परीक्षकांवर (टीसी) करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

हा संपूर्ण प्रकार अंधेरी स्थानकावर घडला असून एका सामान्य मराठी प्रवाशाला तिकीट तपासणीसाठी टीसींनी अडवले होते. महाराष्ट्रात राहत असल्यामुळे टीसींनी मराठीत संवाद साधावा, एवढीच साधी मागणी या प्रवाशाने केली होती. मात्र, ही मागणी तिथल्या अमराठी टीसींच्या जिव्हारी लागली आणि त्यांचा अहंकार दुखावला गेल्याचा आरोप होत आहे. त्यांनी या प्रवाशाला थेट रेल्वे स्थानकावरील एका खोलीत नेऊन जवळपास 1 तास कोंडून ठेवले.

Advertisement

प्रवाशाने या अन्यायाला विरोध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट प्रवाशावरच दबाव आणण्यास सुरुवात केली. संबंधित प्रवाशाविरोधात थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रेल्वे पोलिसांनी सुरू केली. या प्रकरणात मूळ वाद घालणारे आणि प्रवाशाला खोलीत डांबणारे टीसी हे अमराठी होते. मात्र, या प्रकरणाला भाषिक रंग मिळू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने अत्यंत हुशारीने अमराठी टीसींना पाठीशी घातले आणि एका मराठी टीसीला पुढे करून ही तक्रार नोंदवण्याचा खटाटोप सुरू केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी आणि विविध संघटनांनी केला आहे.

(नक्की वाचा : मुंबईत चाललंय काय? शेवपुरी खाण्यासाठी ड्रायव्हरनं BEST बस भररस्त्यात 20 मिनिटं थांबवली; धमकीही दिली, VIDEO )

मराठी एकीकरण समिती आक्रमक

या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून ते पीडित प्रवाशाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या मराठीद्वेषाविरोधात समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाला या कृत्याचा जाब विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीने अंधेरी पूर्व येथील आरपीएफ (RPF) कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

आपल्याच राज्यात आपल्या मातृभाषेत बोलण्याची मागणी करणे हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर प्रवासी विचारत आहेत. या गंभीर प्रकरणात आता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात आणि मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.