Mulund Best bus driver Shevpuri video: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या एका चालकाचा अत्यंत बेजबाबदार आणि तितकाच चक्रावून टाकणारा प्रकार मुंबईत समोर आला आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या बेस्ट बसच्या चालकाला अचानक शेवपुरी खाण्याची तीव्र इच्छा झाली. या इच्छेपोटी त्याने चक्क प्रवाशांनी भरलेली आणि पाठीमागे शेकडो वाहनांची रांग लागलेली असतानाही भररस्त्यात बस उभी केली.
शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी ड्रायव्हरने तब्बल 20 मिनिटांहून अधिक काळ बस रस्त्यातच उभी करून ठेवल्यामुळे परिसरात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या सामान्य नागरिकांना चालकाने थेट शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
ही संपूर्ण घटना मुलुंडमधील एमजी रोड परिसरात घडली आहे. बेस्टच्या एका चालकाला ड्युटीवर असताना शेवपुरी खाण्याची हुक्की आली. त्याने आजूबाजूच्या वाहतुकीचा आणि बसमधील प्रवाशांचा कोणताही विचार न करता, शेवपुरीच्या गाडीजवळ मुख्य रस्त्यावरच बस थांबवली. तब्बल 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही बस एकाच जागेवर उभी होती. एमजी रोड हा आधीच वर्दळीचा रस्ता असल्याने या एका बसमुळे पाठीमागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि परिसरात मोठी कोंडी झाली.
( नक्की वाचा : Palghar : हसता हसता रडू आलं! पालघरमधल्या धबधब्यावर अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र, पर्यटकांचा जीव... पाहा VIDEO )
या वाहतूक कोंडीमध्ये अनेक नागरिक आणि वाहनधारक अडकून पडले होते. कोंडीत अडकलेल्या एका सुजाण तरुणाने बस चालकाजवळ जाऊन भररस्त्यात बस उभी करण्यामागचे कारण विचारले आणि जाब मागितला. त्यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी चालकाचा अहंकार प्रचंड सुखावला.
त्याने थेट त्या तरुणाला उद्देशून शिवीगाळ केलीय शिवीगाळ केल्यानंतर चालकाने तिथून बस पळवून नेली. या सर्व प्रकाराचे त्या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले होते आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
कठोर कारवाईचे आदेश
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईकरांमधून बेस्ट प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची गंभीर दखल अखेर बेस्ट प्रशासनाला घ्यावी लागली आहे. बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. मुलुंड आगार व्यवस्थापकाला या संबंधित उद्धट आणि बेजबाबदार चालकाविरुद्ध तात्काळ आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेवपुरी खाण्याची हौस आता या बेस्ट बस चालकाला भलतीच महागात पडणार असल्याचे दिसत आहे.
पाहा VIDEO
Mulund | शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी 20 मिनिटे थांबवली बस, जाब विचारणाऱ्यांना चालकाची शिवीगाळ ...| NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 10, 2026
मुलुंड परिसरातून मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बस चालकाच्या बेजबाबदार आणि अत्यंत संतापजनक कारभाराचा एक अजब प्रकार समोर आला आहे. मुलुंडमधील गजबजलेल्या एमजी… pic.twitter.com/KZBlCVq2PX
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world