Navi Mumbai : खारघर पांडवकडा धबधब्यावर जीवघेणा थरार, अग्निशमन दलानं वाचवले तरुणाचे प्राण

नवी मुंबई खारघरमधील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण असलेल्या पांडवकडा धबधब्यावर एका तरुणाचा जीव टांगणीला लागला होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

नवी मुंबई खारघरमधील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण असलेल्या पांडवकडा धबधब्यावर एका तरुणाचा जीव टांगणीला लागला होता.  अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह धोकादायक पातळीवर पोहोचलेला असतानाही हा तरुण आतमध्ये अडकला होता. मात्र, वेळेवर मिळालेल्या माहितीच्या आधारे खारघर अग्निशमन दलाने अतिशय धाडसी आणि जोखमीचं ऑपरेशन करत सदर तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं.

धोकादायक थरार… आणि धाडसी बचाव मोहीम

नवी मुंबई खारघर अग्निशमन केंद्रातील जवानांना संध्याकाळी नागरिकांकडून माहिती मिळाली की, एक तरुण धबधब्याच्या अतिशय आतल्या भागात अडकलेला आहे. पावसामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली कोसळत होतं. अशा वेळी बचावकार्य राबवणं हे अत्यंत धोक्याचं होतं. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खारघर अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर दोर आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने अग्निशमन जवानांनी या तरुणापर्यंत पोहचत त्याला सुरक्षित बाहेर काढलं. यावेळी पाण्याचा वेग आणि उतारावरून घसरत येणारे दगड, झाडं हे सगळं प्रसंग अधिकच जोखमीचं झालं होतं.

( नक्की वाचा : Pune News: पवना आणि भाटघर धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नागरिकांना महत्त्वाचा इशारा )

बंदी असूनही...

महत्वाचं म्हणजे, पांडवकडा धबधब्यावर नागरिकांना प्रवेश करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची पार्श्वभूमी पाहता ही बंदी लावण्यात आली आहे. तरीसुद्धा, काही तरुण नजर चुकवून आडवाटांमार्गे आतमध्ये प्रवेश करतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी धोकादायक स्टंट करत अनेकजण आपल्या जीवाशी खेळ करताना दिसतात.

Advertisement

प्रशासनाचं आवाहन

खारघर अग्निशमन विभागाचे प्रमुख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “प्रकृतीच्या सौंदर्याचा आनंद घेणं चुकीचं नाही, पण त्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं पूर्णतः अयोग्य आहे. पांडवकडा धबधब्याजवळ प्रवेश बंदी आहे. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी स्थानिक पोलीस आणि वनविभाग एकत्रितपणे काम करत आहेत.”

गेल्या काही वर्षांत या धबधब्यावर घडलेल्या अपघातांनी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही तरुणाईकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळेवर पोलीस, अग्निशमन दल किंवा NDRF ची मदत पोहोचली नाही, तर ही मनमानी प्राणघातक ठरू शकते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article