Traffic jam: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय; अवजड वाहनांवरील बंदी 2 तासांनी वाढवली

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, तळवडे, वाकड, देहू रोड आणि आळंदी यांसारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील अवजड वाहनांवरील बंदीचा कालावधी आता 2 तासांनी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत अशी बंदी अवजड वाहनांना होती. आता ही वेळ वाढवून सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत अशी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, तळवडे, वाकड, देहू रोड आणि आळंदी यांसारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या. याशिवाय जुना मुंबई-पुणे महामार्ग, कात्रज-देहू रोड बायपास आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर झाली होती. यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

(नक्की वाचा- Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?)

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या म्हणण्यानुसार, अवजड आणि हळू चालणाऱ्या वाहनांवर बंदीची वेळ वाढवल्यामुळे शहरातील वाहतुकीची स्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यामुळेच अवजड वाहनांवरील बंदीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियम वाहतूक कोंडीची समस्या किती प्रमाणात सोडवतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, तात्काळ दिलासा देण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article