PM Modi inaugurates ISCKON temple Kharghar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (15 जानेवारी) नवी मुंबईतील खारघरमधील इस्कॉनच्या (ISKCON) श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देश समजून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, हे सांगितलं. 'इस्कॉन' ज्या सेवावृत्तीनं काम करत आहे, त्याच सेवावृत्तीनं आपलं सरकारही काम करत असल्याचा मला आनंद आहे, असं पंतप्रधान या भाषणात म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत कसा समजणार?
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, 'भारत हा केवळ भौगोलिक सीमांमध्ये बांधलेला जमिनीचा तुकडा नाही. भारत ही एक जिवंत भूमी आहे, एक जिवंत संस्कृती आहे आणि या संस्कृतीची चेतना येथील आध्यात्म आहे. त्यामुळे भारताला समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आध्यात्म आत्मसात करावं लागेल.
जगाकडं भौतिक नजरेतून पाहणाऱ्यांना भारत हा वेगवेगळ्या भाषा आणि राज्यांचा समूह दिसतो. पण, तुम्ही तुमच्या आत्म्याला या सांस्कृतिक जाणीवेशी जोडता तेव्हा तुम्हाला भारताचे विशाल रूप दिसते.'
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
खरी धर्मनिरपेक्षता काय?
सेवेची खरी भावनाच सामाजिक न्याय देऊ शकते, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. हे खऱ्या धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे. कृष्णा सर्किटच्या माध्यमातून आमचं सरकार वेवेगळ्या तीर्थ आणि धार्मिक स्थळांना जोडत आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत या सर्किटचा विस्तार आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
कसं आहे खारघरचं इस्कॉन मंदिर?
नवी मुंबईतील खारघरमध्ये 9 एकरात पसरलेल्या आशियातील सर्वात मोठं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकवरील सर्वात मोठं इस्कॉन मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. इस्कॉन मंदिरात जवळपास 3 हजार भाविकांसाठी एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत जवळपास 200 कोटींचा खर्च करण्यात आला असून भक्तांनी दान केलेल्या पैशातून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
जगभरात इस्कॉनची सुमारे 800 मंदिरे आहेत. मात्र इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामी यांचे स्मारक असलेलं हे एकमेव मंदिर आहे.