देवा राखुंडे, इंदापूर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकलाय. या कारवाईत कॅफेचा मालक व कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे. ताब्यात घेतलेल्या कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंदापूर शहरातील बस स्थानकाजवळच नारायणदास रामदास हायस्कूल आणि त्याच्या बाजूला इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या उच्च शिक्षण संस्थांचा परिसर आहे. याच परिसरात काही कॅफे चालवले जात होते. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना या ठिकाणी अश्लील चाळे चालतात याबाबत टीप मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी 21 जून रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास या चालवल्या जाणाऱ्या कॅफेवरती धाड टाकली.
(नक्की वाचा - तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल)
यावेळी पोलिसांना या कॅफेमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असल्याचं उघड झालं. एकूण तीन कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काही शालेय विद्यार्थिनींना पोलिसांनी सूचना देऊन सोडल्याची माहिती आहे. तर काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
(नक्की वाचा - NDTVच्या बातमीची दखल, 'त्या' धोकादायक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल; अज्ञात तरुण-तरुणीचा शोध सुरू)
इंदापूरमध्ये खेड्यापाड्यातून आणि आसपासच्या तालुक्यातून या ठिकाणी शिक्षणासाठी मुले-मुली येत असतात. मात्र अशा कॅफेमुळे मुले मुली भरकटत आहेत. याचा परिणाम समाजावर होतो. मुलांनी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसण्यास चहा पिण्यास हरकत नाही. मात्र कॅफेच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या या अश्लील गोष्टी करणे गैर आहे. कॅफे परवानाधारक होते का याची चौकशी सुरु असून कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितला आहे.