Prabhadevi Bridge : मुंबईतील सर्वात जुन्या पुलापैकी एक असलेला प्रभादेवी पूल आज (25 एप्रिल) मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. या निर्णयाला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामामुळे 19 इमारतींच्या रहिवाशांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या कामाचा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक रस्त्यावर उतरले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिकांच्या पुनर्वसनासंदर्भात सरकारने योग्य भूमिका घ्यावी अशी या रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे स्थानिकांकडून पूल बंद करण्याआधीच रास्ता रोको करण्यात आला. हा पूल बंद करण्यासाठी प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावण्यात येत होती. त्याला स्थानिकांनी विरोध केला.
प्रभादेवीचा एल्फिन्स्टन पूल 1913 साली ब्रिटीश राजवटीमध्ये बांधण्यात आला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन यांच्या नावावरुन पुलाचं नाव देण्यात आलं होतं. प्रभादेवी आणि लोअर परेलच्या दरम्यान हा पुल आहे. दोन रेल्वे मार्गांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. 200 वर्ष टिकेल या हेतूनं हा पुल बांधण्यात आला होता.
( नक्की वाचा : नवी मुंबई विमानतळ जगभरात बेंचमार्क ठरणार, मुंबईकरांच्या रोजगारातही होणार वाढ! )
हा मार्ग पुढील वर्षभरासाठी बंद राहील. त्यामुळे वर्षभरासाठी येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. यामुळे मात्र प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अटल सेतुवरून येणाऱ्या वाहनांना जलद गतीने वरळीपर्यंत पोहोचविण्यासाठी 4.5 किमी लांब शिवडी-वरळी कनेक्टरचं बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासनाने अटल सेतू, वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोडला एकमेकांशी जोडण्याचा प्लान तयार केला आहे. शिवडी-वरळी हा नवा उन्नत मार्ग प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रभादेवी उड्डाणपूल येथून जाईल. मात्र प्रभादेवी उड्डाणपूल जुना झाल्याने नवा पुलाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय किंवा डबल डेकर पूल बांधून उन्नत रस्ता पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या मार्गाचा करणार वापर?
दादर पश्चिम व दादर मार्केटकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर
प्रभादेवी व लोअर परळकडे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर
प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोडच्या दिशेने जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर
टाटा रुग्णालय, के.ई.एम रुग्णालय येथ जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर, करवा अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.