गोविंदांना एक खास व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षित प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ झाला आहे. प्रो गोविंदा सीझन 3 (Pro Govinda League Season 3) चषकाचे अनावरण मीरा-भाईंदर येथे एका भव्य सोहळ्यात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रो गोविंदाच्या तिसऱ्या पर्वाचे ब्रँड अॅम्बेसेडर ख्रिस गेल, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक उपस्थित होते. यांच्यासोबतच बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे आंतरराष्ट्रीय पाहुणेही उपस्थित होते.
प्रो गोविंदा सीझन 3 स्पर्धा किती दिवस चालणार?
प्रो गोविंदा लीगचे तिसरे पर्व 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी वरळीतील डोम, एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार आहे. या वर्षीची स्पर्धा अधिक भव्य असणार आहे. यात 16 व्यावसायिक संघ आणि 3200 हून अधिक गोविंदा सहभागी होणार आहेत. या सीझनमध्ये एकूण 1.5 कोटी रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला 75 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 50 लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 25 लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघाला 3 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
( नक्की वाचा: स्मृती इराणी ठरल्या सर्वाधिक महागड्या टीव्ही अभिनेत्री; मानधन ऐकून थक्क व्हाल )
ख्रिस गेल भारावला
या सोहळ्यात ख्रिस गेल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर तरुण गोविंदांनी सादर केलेल्या सात थरांच्या मानवी मनोऱ्याच्या प्रात्यक्षिकाने सर्वांची मने जिंकली. या वेळी ख्रिस गेल यांनीही गोविंदांसोबत सहभाग घेतलाय. यावेळी बोलताना ख्रिस गेल याने म्हटले की, "प्रो गोविंदा लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. गोविंदांमधील ऊर्जा, समन्वय आणि सांस्कृतिक अभिमान अतुलनीय आहे. ही लीग केवळ एक उत्सव नसून एक अनोखा खेळ आहे, ज्यात जागतिक स्तरावर लोकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. या प्रवासाचा भाग झाल्याचा मला आनंद आहे आणि मी अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे."
विला फ्रांका प्रतिनिधींची विशेष उपस्थिती
प्रो गोविंदा लीगने, विला फ्रांकाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे मानवी मनोऱ्यांची परंपरा अधिक मजबूत झाली आहे. महाराष्ट्राच्या दहीहंडीला जागतिक खेळाचा दर्जा मिळवून देणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले की, एकेकाळी स्थानिक पातळीवरील उत्सव आता संस्कृती, शिस्त आणि कौशल्याचे जागतिक प्रदर्शन बनले आहे. ख्रिस गेल यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
प्रो गोविंदा सीझन 3 मध्ये किती संघांचा सहभाग आहे?
प्रो गोविंदा लीगच्या या तिसऱ्या पर्वात बँगलोर ब्लेझर्स, लखनऊ पँथर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, गोवा सरफर्स, शूर मुंबईकर, नवी मुंबई स्ट्राइकर्स, ठाणे टायगर्स, नाशिक रेंजर्स, नागपूर निंजास, हैदराबाद डायनॅमोस, दिल्ली ईगल्स, मीरा-भाईंदर लायन्स, जयपूर किंग्स, मुंबई फालकन्स, आणि अलिबाग नाईट्स हे संघ सहभागी होणार आहेत.
( नक्की वाचा: कबुतरांच्या एक पिसामुळे मुंबईच्या वनिता सांगडेंचं आयुष्य उद्ध्वस्त )
कुठे पाहता येईल स्पर्धा?
प्रो गोविंदा सीझन 3 या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण झी5 वर पाहता येणार आहे. ( Pro Govinda Season 3 Live Streaming on Zee5). प्रो गोविंदा सीझन3 तर्फे ही माहिती देण्यात आली आहे.