यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune BJ Medical College News Today : बीजे मेडिकल कॉलेजच्या आवारात आज भर पावसात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.शैक्षणिक,प्रशासकीय तसेच वसतिगृहातील नियमांबाबत गंभीर तक्रारी करत विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयातील नियम वारंवार बदलले जात असून त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टता दिली जात नाही. शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे, असे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. महाराष्ट्र यूनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (MUHS) च्या ओरल प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांच्या खर्चासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून ही पद्धत तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख तक्रारी आणि मागण्या
स्टुडंट नर्सेस असोसिएशन (SNA) निधीच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवावी
मेकअप ड्युटी व क्लिनिकल पोस्टिंगचे नियम स्पष्ट व न्याय्य असावेत
१:५ प्रमाणातील असमान मेकअप ड्युटी रद्द करावी
विद्यार्थ्यांवर मानसिक ताण आणणारे प्रशासकीय निर्णय थांबवावेत
जातीवाचक टिप्पणी व भेदभाव थांबवून सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यावी
नक्की वाचा >> Ashok Kharat: खरातचा नवा कारनामा उघड, सोन्याऐवजी दिल्या पितळी अन् पुष्पराज अंगठ्या, उद्योगपतीची SIT कडे धाव
वसतिगृहासंदर्भातील गंभीर आरोप
वसतिगृहातील कठोर व अव्यवहार्य नियमांमुळे विद्यार्थिनी त्रस्त
बाहेर जाण्याच्या वेळांवर कठोर बंधने,उशीर झाल्यास मानसिक छळ
कपड्यांवर टिप्पणी,चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप
रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांकडून असभ्य भाषेचा वापर
अभ्यासासाठी दालने बंद ठेवणे व वैयक्तिक गोपनीयतेत हस्तक्षेप
अन्य महत्त्वाच्या मागण्या
सांस्कृतिक कार्यक्रम (SPANDAN) व क्रीडा स्पर्धांमध्ये मुक्त सहभागाची परवानगी
शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत पारदर्शकता
विद्यार्थ्यांना धमकावणे,अंतर्गत गुणांबाबत दबाव टाकणे थांबवावे
महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा
नक्की वाचा >> White Leopard Video : नाशिकमध्ये खळबळ! 'या' भागात पहिल्यांदाच आढळला पांढरा बिबट्या, धडकी भरवणारा व्हिडीओ
विद्यार्थ्यांनी आरोप केला की,काही प्रसंगी योग्य चौकशी न करता आरोप केले जातात आणि तोंडी छळ तसेच धमकीच्या भाषेचा वापर होतो.काही शिक्षकांच्या वैयक्तिक पक्षपातामुळे शैक्षणिक मूल्यमापनावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भर पावसात केलेल्या या आंदोलनामुळे बी.जे.मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.