अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Ganesha Immersion Procession Preparations : राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. गणरायाचं वाजत-गाजत आगमन तसंच त्यानंतर येणारा गौरी पूजनाचा सण मोठ्या आनंदानं आणि भक्तीभावानं साजरा झाला आहे. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन हे शनिवारी (6 सप्टेंबर) रोजी होणार आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची एक खास परंपरा आणि आकर्षण आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दरवर्षी गर्दी आणि वेेळेचा नवा विक्रम करत असते. यंदाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी खास नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचं वेळापत्रक आणि नियमावली पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे. यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता आणि शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
मानाचे गणपती आणि मिरवणुकीचे वेळापत्रक
सकाळी 9:15 वाजता: पहिला मानाचा कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पोहोचेल.
सकाळी 9:30 वाजता: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि हा गणपती बेलबाग चौकात पोहोचेल.
सकाळी 10:15 वाजता: कसबा गणपती लक्ष्मी रोडकडे प्रस्थान करेल.
सकाळी 10:30 वाजता: दुसरा मानाचा गणपती (तांबडी जोगेश्वरी) बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल.
दुपारी 1:00 वाजता: सहावा (महापालिका गणपती) आणि सातवा (त्वेष्ट कासार गणपती) मंडळ मिरवणुकीत सामील होतील.
दुपारी 3:45 वाजता: लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे मुख्य मिरवणुकीत सामील होतील.
दुपारी 4:00 वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत सामील होईल.
संध्याकाळी 5:30 नंतर: जिलब्या मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळे मिरवणुकीत सामील होतील.
( नक्की वाचा : Maharashtra Work Hours : राज्यात कामाचे तास 10 होणार; महिलांनाही नाईट शिफ्ट, सरकारने कंबर कसली )
मिरवणुकीसाठी महत्त्वाचे नियम
टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान ढोल-ताशा वाद्य वाजवण्यास सक्त मनाई आहे. बेलबाग चौकानंतरच ढोल-ताशा वाजवण्यास परवानगी दिली जाईल. प्रत्येक मंडळाला फक्त 1 DJ किंवा 1 ढोल-ताशा पथक ठेवण्याची परवानगी आहे. प्रत्येक ढोल-ताशा पथकात जास्तीत जास्त 60 सदस्य असावेत.
गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान आपापसात योग्य अंतर ठेवावे आणि रेषा तोडू नये. कसबा गणपती अलका टॉकीज चौकाजवळ पोहोचेपर्यंत इतर मंडळांना त्या ठिकाणी थांबण्यास परवानगी नाही. तसेच, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी 10:30 पूर्वी सुरू होणार नाहीत.
बेलबाग चौकात परिशिष्ट 1, 2 आणि 3 मधील मंडळांना प्राधान्य दिले जाईल. इतर मंडळांना प्रथम येणाऱ्याला प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.
पुणे पोलिस आयुक्तालयाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या नियमांचे पालन करून मिरवणूक सुरळीत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.