सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्याजवळील हिंजवडी येथील एका अंगणवाडीमध्ये 20 लहान मुलांना खोलीत आतून कडी लावून कोंडल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिंजवडीतील म्हातोबा टेकडीजवळ असलेल्या अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रकार घडला आहे. अंगणवाडी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी या निरागस चिमुकल्यांना खोलीत कोंडले आणि त्या दोघीही ग्रामपंचायतीच्या एका बैठकीसाठी गेल्या होत्या.
खोलीत बराच वेळ त्यांच्यासोबत कोणतीही मोठी व्यक्ती नसल्यामुळे मुलांना भीती वाटू लागली. त्यामुळे काही मुलांना बाथरूमला जायचे होते, तर काहींना आईची आठवण येत असल्यामुळे थरकाप उडालेल्या सर्व चिमुरड्यांनी मोठा आक्रोश सुरू केला. हा आक्रोश ऐकून जवळून जाणाऱ्या काही पालकांच्या हे लक्षात आले. जेव्हा पालक तिथे आले, तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेले होते आणि आतमध्ये कोणीही नव्हते, हे पाहून पालकही हतबल झाले.
( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
अंगणवाडी सेविका सविता शिंदे यांनी मुलांच्या कोंडण्यामागे ग्रामपंचायतीची बैठक असल्याचे कारण दिले आहे. त्यांनी हिंजवडी ग्रामपंचायत सदस्य शिवनाथ जांभुळकर यांच्या सांगण्यावरून बैठकीला गेल्याचे सांगितले.
या संदर्भात, शिक्षण विभाग सदस्य शिवनाथ जांभुळकर यांच्याशी संपर्क साधला असता, मुलांना कोंडून ठेवण्यास सांगण्याचा प्रश्नच येत नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया जांभुळकर यांनी दिली आहे.
जांभुळकर यांच्या खुलाशानंतर आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मुलांना कोंडून ठेवण्याच्या परिस्थितीत बैठकीला बोलावण्याचे जांभुळकर यांना कोणते अधिकार होते, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीचे पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चिमुकल्यांना अशाप्रकारे कोंडून ठेवणं आणि त्यांच्याजवळ कोणीही नसणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे मत व्यक्त केले आहे.
सध्या या प्रकरणात पोलीस अंगणवाडी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर काय कारवाई करणार आणि अंगणवाडीच्या सुरक्षिततेचे काय होणार, हे मात्र अनुत्तरित आहे.