Maarashtra Rain Forecast: राज्यात विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी पावसाची घनता कमी असल्याने त्याचा एकूण जोर मर्यादित राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप आणि प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 ते 72 तासांत राज्यातील विशिष्ट भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार
पुढील 48 तासांसाठी कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ढगांची घनता कमी असली तरी स्थानिक हवामान प्रणालीमुळे घाटमाथ्यावर तीव्र सरी कोसळू शकतात.
(नक्की वाचा- Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा)
विदर्भातील 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भासाठी आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम विदर्भात पुढील 48 तासांत पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
(नक्की वाचा- Fake SIM Cards: तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत? संभाव्य धोका टाळण्यासाठी कसं कराल चेक?)
मराठवाड्यात पावसाची तूट कायम
एकीकडे कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना, मराठवाड्यात मात्र पाऊस पुन्हा हुलकावणी देण्याची चिन्हं आहेत. मराठवाड्यात सध्या कोणतीही मजबूत हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुरेशा पावसाअभावी मराठवाड्यात आधीच 40 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, आगामी काळात ही चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेषतः विदर्भ आणि कोकणातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.