- सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टाने नाकारली
- सिया आणि चेतनला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
- सरकारी वकिलांनी सांकेतिक भाषेतील संभाषण तपासण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचे सांगितले होते
सूरज कसबे
केतन अग्रवाल केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्य सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. शिवाय या दोघांची ही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीसाठी दिलेली कारणे कोर्टाने मान्य केली नाहीत. त्यामुळे कोर्टाने एक प्रकारे पुणे ग्रामीण पोलीसांना या प्रकरणी दणका दिल्याचं बोललं जात आहे. तसेच न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे सिया आणि चेतनचा जामीन मिळवण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे.
पोलीस कोठडी संपत असल्याने सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा,सराव ठिकाणी पंचनामा, पासपोर्ट फाडले तिथं पंचनामा याची माहिती कोर्टाला दिली. शिवाय कपडे जप्त केल्याचं ही सांगितलं. शिवाय सिया आणि चेतनचा मोबाईल डेटा प्राप्त झाला आहे. त्याची समोरासमोर पडताळणी करायची आहे असं ही कोर्टाला सांगितलं. रिकव्हर डेटामध्ये सांकेतिक भाषा वापरून संभाषण झालं आहे. त्यामुळे दोघांची चौकशी गरजेची असल्याचं ही पोलीसांनी सांगितलं. या कटात जवळच्या व्यक्तीचा सहभाग आहे का? याचाही तपास करायचा आहे असं कोर्टात सांगण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींना समोरासमोर बोलून चौकशी करायची आहे त्यामुळे3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली.
सरकारी वकीलांनी ही यावेळी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तीवाद केला. ते म्हणाले की सियाचा दुसरा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. त्यातील सांकेतिक भाषेची पडताळणी करायची आहे. समोरासमोर चौकशी करणे महत्वाचे आहे त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचं त्यांनी कोर्टाला संगितलं. यावर सियाचे वकील विपुल दूशिंग यांनी युक्तीवाद करत सरकारी पक्षाचे सर्व मुद्दे खोडून काढले. ते म्हणाले तपासात सिया खूप सहकार्य करत आहे. तिचा मोबाईल ही रिकव्हर झाला आहे. त्यामुळे तिने काय लिहिलंय, सांकेतिक चिन्हांची पडताळणी, हे कायद्यात बसत नाही. त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळे पोलीस कोठडी देवू नये असं त्यांनी कोर्टात सांगितलं.
चेतनच्या वकीलांनी ही यावेळी चेतनला पोलीस कोठडी देवू नये असा युक्तीवाद केला. शक्यतांच्या आधारवर ती देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर सरकारी वकीलांनी सांकेतिक चिन्ह आणि निक नेमचा वापर का आणि कशासाठी केलाय? हे ते दोघेचं सांगू शकतात, त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची आहे असं सरकारी वकील म्हणाले. मात्र कोर्टाला ही गोष्ट मान्य झाली नाही. नार्को टेस्टसाठी आरोपींची सहमती गरजेची असल्याचं यावेळी कोर्टाने सांगितलं. शिवाय पोलीसांची आणि सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी ही कोर्टाने फेटाळली. ज्या कारणासाठी पोलीस कोठडी मागितली जात आहे ती कारणे पुरेसी नाहीत असं कोर्टने म्हणलं. त्यानंतर दोघांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान आता सिया आणि चेतनचा जामीन मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.