यंदाच्या मोसमात पुणेकरांनी तब्बल 4 कोटींचे आंबे फस्त केले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत 'आंबा महोत्सव 2025' चे आयोजन केले होते. मार्केटयार्ड तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या चार ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार या आंबा महोत्सवात 45 हजार डझन आंब्यांची विक्री झाली आहे. या महोत्सवात एकूण 4 कोटींची उलाढाल झाल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
GI मानांकन असलेले आंबे
या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. पण आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन, या महोत्सवातदेखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नक्की वाचा : थर्माकोलपासून टॉयलेट बनवणारा थर्माकोल मॅन ऑफ इंडिया, कोण आहेत रामदास माने?
हापूसपासून बिटकी आंब्यापर्यंत, सगळ्या आंब्यांना मागणी
आंबा महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे 60 स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 120 स्टॉल्स 150 उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जीआय व युआयडी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे. महोत्सवामध्ये साधारणत: 175 ते 300 ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत असून 400 ते 800 रुपये प्रति डझन दर आहे, अशी माहिती देखील कदम यांनी दिली आहे.
नक्की वाचा :दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी आता मोठं पाऊल, घेतला 'हा' निर्णय