
राहुल कुलकर्णी
रामदास माने हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील एक प्रेरणादायी उद्योजक आहेत. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे. आज EPS (थर्माकोल) उत्पादनांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. रामदास माने यांचा प्रवास शेतकामापासून सुरू झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी सातारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वायरमनचा कोर्स केला. या काळात त्यांनी बसस्थानकाच्या कँटीनमध्ये काम करत शिक्षण पूर्ण केले. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये अप्रेंटिसशिपनंतर त्यांनी फिनोलेक्स पाईप्समध्ये देखभाल अभियंता म्हणून काम केले. 1993 साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. EPS मशीनसाठी कंट्रोल पॅनेल तयार करण्यास सुरुवात केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माने इलेक्ट्रिकल्स या त्यांच्या कंपनीने EPS मशीनरीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांच्या उत्पादनांची निर्यात 45 हून अधिक देशांमध्ये होते. ज्यात सौदी अरेबिया, केनिया, घाना, लिबिया, यमन, श्रीलंका आणि दुबई यांचा समावेश आहे. त्यांनी 350 हून अधिक EPS प्रकल्प पूर्ण केले आहेत. जगातील सर्वात मोठी EPS मशीन तयार केल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन, रामदास माने यांनी थर्माकोल आणि सिमेंट कोटिंग वापरून पोर्टेबल टॉयलेट्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी देशभरात 22,000 हून अधिक पोर्टेबल टॉयलेट्स वितरित केली आहेत. ज्यात काही गरजू मुलींना विवाह भेट म्हणून दिली आहेत. हे टॉयलेट्स केवळ दोन तासांत तयार होतात आणि ग्रामीण भागातील स्वच्छता समस्येवर प्रभावी उपाय आहेत.
रामदास माने यांचे सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे दहिवडी येथे उभारलेले “थर्माकोल म्युझियम”. हे जगातील पहिले आणि एकमेव थर्माकोल संग्रहालय आहे. ज्यामध्ये EPS (थर्माकोल) चा इतिहास, उत्पादन प्रक्रिया आणि विविध उपयोग यांचे सविस्तर प्रदर्शन आहे. हे संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, त्यांना नवउद्योजकतेसाठी प्रोत्साहन देईल. संग्रहालयात 200 विद्यार्थ्यांसाठी निवास, गरम पाणी, जेवण आणि इतर सुविधा मोफत उपलब्ध आहेत.माने यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2007, जगातील सर्वात मोठी EPS मशीन तयार केल्याबद्दल नोंद झाली आहे. CSR विथ सॅनिटेशन लीडरशिप अवॉर्ड 2016 सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world