Pune News : पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका डॉक्टरांच्या अति-भयंकर निष्काळजीपणामुळे एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागले. सीझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती करण्यात आली, मात्र याचवेळी डॉक्टरांनी घाईगर्दीत टॉवेल महिलेच्या पोटातच तसाच ठेवला. ही जीवघेणी चूक लक्षात आल्यानंतर कुटुंबाचा आनंद क्षणात विरला. या गंभीर त्रुटीमुळे महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ती तब्बल 3 वर्षे कोमात राहिली. अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पतीने 14 वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला आणि आता राज्य ग्राहक आयोगाने रुग्णालय व संबंधित डॉक्टरांना 26 लाख 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
'टाईम्स ऑफ इंडिया' नं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, पाषाण येथील रहिवासी असलेले प्रशांत कुकडे यांनी सूस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉक्टर दीपलक्ष्मी रगडे यांच्या विरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. ही घटना 8 ऑगस्ट 2008 रोजी घडली होती. प्रशांत यांची पत्नी रूपाली यांना त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीसाठी सीझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया पूर्ण होऊन टाके घालण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की, शस्त्रक्रियेसाठी वापरलेला एक टॉवेल महिलेच्या पोटातच राहिला आहे.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
या भयंकर चुकीमुळे डॉक्टरांना लगेच टाके पुन्हा उघडावे लागले आणि टॉवेल बाहेर काढावा लागला. या संपूर्ण गोंधळात रूपाली यांना लगेचच हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.
3 वर्षे कोमात आणि अखेर दुःखद अंत
दुसऱ्या रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर रूपाली यांना 'एन्सेफॅलोपॅथी' म्हणजेच मेंदूला सूज आल्याचे निदान झाले. यामुळे त्यांना पुन्हा एका वेगळ्या रुग्णालयात हलवावे लागले, परंतु दुर्दैवाने त्या कोमात गेल्या. सुमारे 3 वर्षे त्या कोमातच राहिल्या. अखेर, 1 मे 2011 रोजी त्यांचे निधन झाले. एका निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं.
17 वर्षांनंतर पीडित कुटुंबाला मिळाला न्याय
या प्रकरणात पती प्रशांत कुकडे यांनी 2008 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्षीय सदस्य मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुंबरे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आयोगाने रुग्णालयाला आणि डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवेसाठी स्पष्टपणे जबाबदार धरले आहे.
या निकालामुळे वैद्यकीय सेवा घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तक्रारदारांचे वकील अॅड. ज्ञानराज संत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "विलंबाने का होईना; पण अखेर न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यास आणि वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणण्यास मदत होईल."
आयोगाने ठळकपणे अधोरेखित केलेला निष्काळजीपणा
आयोगाने आपल्या निष्कर्षात डॉक्टरांच्या अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे:
प्रसूतीनंतर रुग्ण महिला अत्यवस्थ झाली असतानाही, तिला तातडीने उच्च दर्जाच्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवले नाही.
रुग्णालय आणि डॉक्टरांनी 'डिस्चार्ज' सह इतर महत्त्वाची वैद्यकीय कागदपत्रे पीडित कुटुंबाला दीड महिन्यानंतर दिली.
ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने हा निष्कर्ष नोंदवला की, शस्त्रक्रियेवेळी महिलेची श्वसननलिका सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, तसेच प्रसूतीपूर्वी ती उपाशी अवस्थेत नव्हती.
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक होते, मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही जीवघेणी चूक झाली.
या सर्व बाबी वैद्यकीय निष्काळजीपणा (Medical Negligence) आणि त्रुटीयुक्त सेवा (Deficiency in Service) असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता अशा प्रकरणांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना ग्राहक आयोगाकडे दाद मागण्याचा मोठा मार्ग मोकळा झाला आहे.