Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3?

Pune Metro Line 3 News : पुणेकरांसाठी विशेषतः आयटी हबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Metro Line 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
पुणे:

Pune Metro Line 3 News : पुणेकरांसाठी विशेषतः आयटी हबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 च्या कामाला आता मोठी गती मिळाली असून, गुरुवारी सकाळी या मार्गावर यशस्वी तांत्रिक चाचणी पूर्ण करण्यात आली. 

या चाचणीमुळे आता या मार्गावर प्रत्यक्षात मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 31 मार्चपर्यंत ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तांत्रिक चाचणी यशस्वी

हिंजवडी आयटी हबला शहराच्या मुख्य भागाशी जोडणाऱ्या या मेट्रो प्रकल्पाची चाचणी गुरुवारी सकाळी 8 वाजता माण डेपो ते पुणे विद्यापीठ चौक या दरम्यान घेण्यात आली. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 

यापूर्वी जुलै 2025 मध्ये माण डेपो ते पुणे विद्यापीठ आणि ऑगस्ट 2025 मध्ये माण डेपो ते बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दरम्यान चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चाचणीत काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या, मात्र रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या मदतीने त्या तातडीने दूर करण्यात आल्या आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
 

सुरक्षेच्या दृष्टीने सूक्ष्म तपासणी

या चाचणी दरम्यान मेट्रो मार्गाची सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये ट्रॅकची रचना, वीज पुरवठा, आपत्कालीन ब्रेक यंत्रणा, डब्यांची स्थिरता आणि वळणांवरील मेट्रोचा वेग यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. 

अतिशय वेगाने मेट्रो धावत असताना होणारी कंपने आणि हालचाली सुरक्षित मर्यादेत असल्याची खात्री या वेळी तज्ज्ञांनी केली. कोणतीही अडचण न येता ही चाचणी पार पडल्याने आता प्रवासी सेवेच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार

गेल्या एक वर्षापासून पुणेकर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून पीएमआरडीए, टाटा ग्रुप आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्याकडून राबवला जात आहे. 

सुमारे 23.3 किलोमीटर लांबीच्या या उड्डाण पुलावरील मेट्रोमुळे हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होईल.

Advertisement

पीमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेट्रो प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्टेशनच्या इमारती, प्लॅटफॉर्म, येण्या-जाण्याचे मार्ग आणि इतर अत्यावश्यक सुविधांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. 31 मार्चपर्यंत बहुतांश स्टेशन्स प्रवाशांसाठी खुली करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले 10 पेक्षा जास्त ट्रेन सेट्स मेट्रो प्रशासनाला प्राप्त झाले असून, लवकरच एकूण 22 ट्रेन सेट्स उपलब्ध होतील. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.