Pune Metro News : पुणेकरांसाठी आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या पुणे मेट्रो लाइन 3 ची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, आता या यशस्वी चाचणीमुळे पुणेकर लवकरच या हायटेक मेट्रोतून प्रवास करू शकणार आहेत. हिंजवडीच्या ट्रॅफिकमधून सुटका होऊन वेगवान प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
मेट्रोच्या या ट्रायल रनमुळे सर्व तांत्रिक यंत्रणांची सज्जता तपासण्यात आली असून हा प्रकल्प आता व्यावसायिक प्रवासासाठी सज्ज होत आहे. आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा हा मार्ग पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरणार आहे.
कशी आहे Pune Metro 3?
पुणे मेट्रो लाइन 3 हा प्रकल्प एकूण 23.203 किलोमीटर लांबीचा आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत (Elevated) स्वरूपाचा असून यात एकूण 23 स्टेशन्सचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 8313 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 8 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते. तेव्हापासून या मार्गाच्या कामाची उत्सुकता पुणेकरांना लागून राहिली होती.
( नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
प्रदूषणमुक्ती आणि वेळेची बचत
राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. ही समस्या सोडवण्यासाठीच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या मेट्रोचे नियोजन केले होते. या मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणाची पातळी खाली येण्यास मदत होणार आहे. तसेच इंधनाची बचत आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ही मेट्रो अत्यंत प्रभावी ठरेल. आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि नोकरदारांना ट्रॅफिकच्या कटकटीशिवाय वेळेत कामावर पोहोचणे आता शक्य होणार आहे.
असे असेल मेट्रो स्टेशन्सचे जाळे
या मार्गावर एकूण 23 स्टेशन्स असून ती महत्त्वाची ठिकाणे कव्हर करतात. यामध्ये मेगापॉलिस सर्कल येथून प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी आणि वाकड चौक अशी महत्त्वाची आयटी क्षेत्रातील स्टेशन्स असतील. पुढे बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर आणि शेवटचे स्टेशन सिव्हिल कोर्ट असे हे मेट्रोचे जाळे पसरलेले असेल.
( नक्की वाचा : Pune News: पुणे स्टेशनवर आता नो गर्दी, नो गोंधळ, रेल्वे प्रशासनाचा मोठा 'गेम चेंजर' प्रकल्प! वाचा सविस्तर )
पायाभूत सुविधांचा नवा टप्पा
पुणे मेट्रो लाइन 3 मुळे शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्यामुळे आता लवकरच सुरक्षा तपासणी आणि अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर ही मेट्रो सर्वसामान्यांच्या सेवेसाठी खुली होईल, ज्यामुळे पुण्याच्या विकासाचा वेग अधिक वाढणार आहे.
पाहा VIDEO