अविनाश पवार
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आलेली सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या रविवारमुळे मोठ्या संख्येने पुणेकरांनी आपल्या गावाकडे धाव घेतली होती. मात्र, सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच आज सोमवारी कामावर परतणाऱ्या चाकरमान्यांची अचानक झालेली प्रचंड गर्दी पुणे मेट्रोच्या सेवेवर ताण आणणारी ठरली. यामुळे पुणे स्टेशनसह शहरातील अनेक मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे पुणेकरांचा मेट्रोचा ऐरवी असणारा शांत-निवांत प्रवास सोमवारी गडबड,गोंधळाचा आणि धक्काबुक्कीचा झाला होता.
( नक्की वाचा: 'मेट्रो लाईन- 3' चा उरळी कांचनपर्यंत विस्तार होणार, अजित पवारांंनी मांडला प्रस्ताव )
तिकीटासाठी रांगा
पुणे स्टेशन येथील मेट्रो स्थानकावर सकाळी 9 च्या सुमारास गर्दीचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली. अनेक प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या, ज्यामुळे त्यांचा वेळ वाया गेला. काही प्रवाशांनी सांगितले की, त्यांना तिकीट मिळवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. व्हॉटसअपवर तिकीट कसे काढावे हे माहिती नसलेल्या आणि ज्या प्रवाशांना मेट्रोच्या प्रवासाची माहिती नव्हती अशा प्रवाशांमुळे गोंधळात भर पडली होती.
पुणे मेट्रोची मुंबई लोकलसारखी अवस्था
प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता मेट्रोच्या डब्यांमध्ये बरीच गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऐरवी मेट्रोतून प्रवास करत असताना नीटपणे बसायला मिळायचे मात्र आज मेट्रोची अवस्था ही काहीशी मुंबईतील लोकल ट्रेनसारखी झाली होती. कारण बऱ्याच प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला होता. मेट्रोत झालेल्या गर्दीमुळे प्रत्येक स्थानकात मेट्रोतून उतरणाऱ्यांना आणि मेट्रोत चढणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागली होती. शनिवारी आणि रविवारी आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे जी मंडळी बाहेरगावी गेली होती ती पुण्याला परतल्याने ही गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
( नक्की वाचा: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता )
एकूणच, सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पुणे मेट्रोवर अचानक आलेल्या प्रवासी ताणामुळे प्रवासाची गैरसोय झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. नियमित प्रवासासाठी मेट्रोवर अवलंबून असलेल्या अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला.