Pune Metro: गणपती बाप्पा पुणे मेट्रोला पावला! उत्पन्न आणि प्रवासी संख्येचे सगळे विक्रम मोडीत निघाले

Pune Metro record ridership Ganeshotsav 2025: सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाझ या मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार

Pune Metro Service For Ganesh Visarjan 2025: पुणे मेट्रोने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी 41 तास अखंडित सेवा पुरवली.(Pune Metro 41-hour service Ganesh Visarjan) पुणे मेट्रोचा हा एक नवा विक्रम असून या सेवेचा लाखो प्रवाशांनी लाभ घेतला आहे. शनिवार सकाळी 6 वाजेपासून मेट्रो सेवेला सुरूवात झाली होती. ही सेवा विसर्जनाच्या रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या काळात मेट्रोतून अंदाजे 5.9 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे कळते आहे. पुणे मेट्रोच्या इतिहासात एका दिवसातील ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. पुणेकरांनी आता मोठ्या प्रमाणावर मेट्रो सेवा वापरण्यास सुरूवात केली असून येत्या काळात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल असे बोलले जात आहे.  

नक्की वाचा: अमिताभ बच्चन यांची लालबागच्या राजाबद्दल पोस्ट अन् मराठीचा मुद्दा, भाषेबाबत म्हणाले..

कोणत्या स्थानकांवर होती प्रवाशांची सर्वाधिक गर्दी?

पुण्यातील मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी असल्याचे दिसून आले. मेट्रो स्टेशननिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये मंडई स्थानकात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून आली. मंडई स्टेशनमधून 65,542 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, त्यापाठोपाठ डेक्कन जिमखाना स्टेशनवर 64,703 प्रवाशांची नोंद झाली. स्वारगेट स्टेशनवर 44,917, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्टेशनवर 43,363 आणि पुणे महानगरपालिका स्टेशनवर 39,208 प्रवाशांचू नोंद करण्यात आली आहे.  मेट्रो स्थानकात गर्दी झाल्याने स्टेशनमधून बाहेर पडणे आणि आत शिरणे यात प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागला, मात्र पुणेकरांची याबाबत कोणतीही कुरकुर ऐकायला मिळाली नाही. स्थानकांमध्ये फार गर्दी होऊ नये यासाठी मेट्रो प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून गर्दीचे योग्य नियोजन केले होते.मेट्रो प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार24 तासांत 866 फेऱ्या चालवण्यात आल्या.

विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोने किती प्रवाशांनी प्रवास केला ?

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाझ या मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी व्हॉटसअपद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले होते. दैनंदीन पासचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ज्यामुळे 100 रुपयांत प्रवासी दिवसभरात कितीही वेळा मेट्रोने प्रवास करू शकत होते.  गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या दररोज 3 लाखांपेक्षा जास्त होती. विसर्जनाच्या दिवशी ही संख्या 6 लाखांच्या जवळपास पोहोचली होती. संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोतून एकूण 31,96,446 प्रवाशांनी प्रवास केल्याचे कळते आहे.