- पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक भरती जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आंदोलन केले
- महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आंदोलनास परवानगी नव्हती तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले
- आंदोलन काळात विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले ज्यामुळे पोलिसांना आंदोलकांना हटवण्यात अडचण आली
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आहे. या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं विद्यार्थांमध्ये संताप निर्माण झाला. वयोमर्यादा वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री रस्त्यावर उतरत हे आंदोलन केलं. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्यानं विद्यार्थी संतापले होते. पुण्यातल्या शास्त्री रोडवर MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे कुणालाही आंदोलनाची परवानगी नाही. मात्र, विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला. यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
महत्वाची बाब म्हणजे पोलीस आंदोलकांना हटवण्यासाठी आले, तेव्हा आंदोलकांनी राष्ट्रगीत गायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसही हतबल झालेले दिसले. शेवटी मोठ्या प्रयत्नांनी आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारीही MPSC चे हजारो विद्यार्थी नदीपात्रात एकवटले. आपल्या मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रात्रीच्या आंदोलनानंतर आजही विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी सरकारकडून कुणी पोहोचलं नाही. संध्याकाळच्या सुमारास मराठा आंदोलक मनोज जरांगे नदीपात्रात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेत त्यांनी सरकारला विनंती करतानाच इशाराही दिला.
दरम्यान, मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. रोहित पवारांची सरकारला विनंती केली. संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही. याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नये. विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा. विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
दुसरीकडे प्रहारच्या बच्चू कडू यांनी तर ट्वीट करत सरकारला इशाराच दिला आहे. MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. 80 पेक्षा अधिक लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय मिळत नाही. त्यामुळे शांतता मार्गाने विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात उतरुन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर आज नदीपात्रातही हजारो विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी एकवटले. मात्र, वारंवार मागणी करुनही सरकार लक्ष देत नसेल तर विद्यार्थ्यांकडेही आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.