- मिरजगावमध्ये भाजपकडून विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या रायटिंग पॅडवर सभापती राम शिंदे यांचे फोटो चिकटवले
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर सभापती राम शिंदे यांचा फोटो चिकटवल्यामुळे वाद
- रायटिंग पॅडची ऑर्डर अहिल्यानगर येथील आसरा ट्रेडर्सकडून देण्यात आली होती
प्रसाद शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायटींग पॅडवर असलेल्या फोटोवर भाजपनेत्याने स्वत:चा फोट चिकटवून, त्या ते विद्यार्थ्यांमध्ये वाटण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता सावरासावर केली जात आहे. राज्याच्या विधानसभा मतदारसंघांपैकी महत्त्वाचा असणारा मतदारसंघ म्हणजेच कर्जत जामखेड मतदार संघ ओळखला जातो. या मतदार संघामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार हे एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळतात.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मिरजगाव शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यापैकी विद्यार्थ्यांना वाटण्यात येणारे रायटिंग पॅडची ऑर्डर ही अहिल्यानगर येथील एका व्यावसायिकाला देण्यात आली होती. त्या सर्व रायटिंग पॅडवर सभापती राम शिंदे यांचा फोटो असलेले स्टिकर लावण्यात आले होते. त्यापैकी एका पॅडवरील सभापती राम शिंदे यांचे स्टिकर काढल्यानंतर त्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असल्याचे निदर्शनास आलं.
त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटल्याच पाहायला मिळाले. पॅडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्यावर सभापती राम शिंदे यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स पोस्टवर पोस्ट केला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टीकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जातेय. ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत. याप्रकरणी संबंधितांनी तातडीने जाहीर माफी मागावी..! अशी पोस्ट करण्यात आली होती.
ही घटना समोर आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांची एकच धावपळ झाली. मग त्यांनी अहिल्यानगर येथे येत ज्या दुकानदाराकडून हे पॅड घेतले होते त्याला माफी मागण्यासाठी भाग पाडलं आहे. फॅक्टरीतील कारागिरांच्या चुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या रायटिंग पॅडवर सभापती राम शिंदे यांचे फोटो चिकटविण्यात आले. या चुकीबद्दल व्यावसायिकाने जाहीर माफी मागितली आहे. मुर्जी पटेल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्याच्या आसरा ट्रेडर्सकडून हे पॅड घेण्यात आले होते.
मिरजगाव या ठिकाणी सभापती राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी वाटण्यात आलेल्या रायटिंग पॅडची ऑर्डर ही नगर या ठिकाणी देण्यात आली होती. या रायटिंग पॅडवर सभापती राम शिंदे यांचे फोटो लावावेत असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर रायटिंग पॅड वाटप करण्यात आले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे हे आम्हाला उशिरा लक्षात आलं असं आयोजकांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. आमचा उद्देश हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा नव्हता असं स्पष्टीकरण शेवटी द्यावं लागलं.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टीकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जातेय… ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत.. याप्रकरणी संबंधितांनी तातडीने जाहीर… pic.twitter.com/vUjMgTE6eo
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world