अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन परिसरात रात्रीच्या वेळी ड्रिंक अँड ड्राईव्हची भयंकर घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाने त्याच्या वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण गमावल्याने गाडी थेट गरवारे पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेमुळे पुण्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना 25 मे रोजी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण जंगली महाराज रस्त्याने डेक्कन जिमखाना येथून जात होता. रात्रीची वेळ असल्याने त्याने आपले वाहन (क्रमांक MH 31 FR 5863) अतिशय बेदरकारपणे चालवले होते.
डेक्कन जिमखाना जवळील गरवारे पुलावरून गुडलक चौकाकडे जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या रेलिंगला जोरदार धडकली. वेग इतका जास्त होता की रेलिंग तोडून गाडी थेट पुलाच्या पलीकडे खाली जाऊन कोसळली.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद, महापौरांची मोठी घोषणा! प्रशासनाच्या निर्णयाची चर्चा का? )
19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व अमित जैन (वय 19) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. अपघाताच्या वेळी अथर्व हा दारूच्या नशेत होता आणि याच नशेत त्याने अतिवेगाने गाडी चालवून हा अपघात घडवून आणला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट पेपरफुटीत पुण्याचा 'गॉड' अटकेत! मनिषा हवालदारसोबत नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर )
स्थानिकांची गर्दी आणि नशिबाने वाचलेले प्राण
अपघात झाला तेव्हा जरी मध्यरात्र असली तरी हा भाग रहदारीचा असल्याने आजूबाजूला असलेल्या नागरिक आणि इतर वाहन चालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. गाडी पुलावरून खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, या भीषण अपघातात सुदैवाने चालक वगळता इतर कोणीही जखमी झाले नाही. पुलाच्या खाली कोणी उभे असते किंवा दुसरी एखादे वाहन असते, तर मोठी दुर्घटना घडली असती.
डेक्कन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गाडी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून लोकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकर्णी अथर्व जैन याच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची तयारी पोलिसांनी केली आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर अशा प्रकारे बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या तरुणांमुळे पुणेकरांमध्ये आता संतापाची लाट आहे.