वैष्णवी हगवणेची आत्महत्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या राजेंद्र हगवणे या सासऱ्यासह संपूर्ण कुटुंबानेच वैष्णवीचा छळ केला. तो इतका टोकाचा होती की तिने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचललं. मात्र तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे मात्र अजून तेवढ स्पष्ट झालेलं नाही. तिच्या शवविच्छेदनावरून तिची हत्या झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयां बरोबर फोन वरून बातचीत केली. शिवाय त्यांना धिर ही दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैष्णवीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुपाली ठोंबरे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला. शिवाय अजित पवारांची वैष्णवीच्या वडीलां बरोबर चर्चा करून दिली. झालेला प्रकार दुर्दैवी आहे असं अजित पवारांनी सांगितलं. याबाबत तुम्ही मला आधीच कल्पना दिली असती तर त्यांना चागलं सरळ केलं असतं. पण तसं कुणीही मला सांगितलं नाही. तुम्ही गाडी देत असतानाही मी विचारलं होतं. तुमच्याकडे मागितली आहे की मुलीच्या प्रेमापोटी देत आहात. असं अजित पवार म्हणाले.
शिवाय तुम्ही घाबरू नका. काही झालं तरी मी तुमच्या बाजूने आहे. या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. उलट मला कळल्या कळल्या मी ताबडतोब त्याला अरेस्ट करायला सांगितलं. तिचं मुलही तुम्हाला द्यायला सांगितलं. त्याला अरेस्ट करण्यासाठी तीन टीम लावल्या आहेत. अजून टीम वाढवायला सांगितल्यात आहे. सगळी कलमं घालायला सांगितली आहेत. त्याची आता सुटका नाही. असं म्हणत अजित पवारांनी राजेंद्र हगवणेला त्यांच्या स्टाईलने शिवी ही हासडली.
आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्याने संपवलं आहे. जर नालायकांना नांदवायचं नव्हतं तर घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात इतके हरामखोर आहेत ते असं ही वैष्णवीच्या वडीलां बरोबर बोलताना अजित पवार म्हणाले. अजित पवार असं बोलत असताना त्याच वेळी वैष्णवीच्या आईला रडू कोसळलं. त्या ढसाढसा रडू लागल्या. अजित पवारांनी त्यांना ही धिर दिला. मी तुमच्या घरी तुमची भेट घेण्यासाठी येणार आहे असं ही त्यांनी यावेळी वैष्णवीच्या कुटुंबीयांना सांगितलं.
दरम्यान वैष्णवी हगवणेचा छळ करुन हत्या केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सक्रिय पदाधिकारी असले तरी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी नव्हती. वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सासरा आणि मुख्यसुत्रधार राजेंद्र हगवणे हा त्याच्या मोठ्या मुलासह फरार आहे. वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या मुलाचा ताबा तिच्या आई वडीलांकडे देण्यात आला आहे.