राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
पुणेकरांवरील गुईलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) म्हणजेच जीबीएसचं सावट अद्याप कमी झालेलं नाही. त्यातच पुणेकरांचं टेन्शन वाढवणारी आणखी एक बातमी आहे. शहरात सध्या डुकरांच्या गूढ मृत्यूचं सत्र सुरु आहे.
पुणे शहरातल्या कोथरुडमधील भारती नगर-भिमले टॉवर ड्रेनमध्ये अनेक मृत डुकरे आढळून आली आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डुकरांच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. पुणे महानगरपालिकेने मृत डुकरांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा तपासाणी अहवाल अद्याप बाकी आहे. पण, शहरात जीबीएसचे रुग्ण वाढत असतानाच डुकरांच्या मृत्यूच्या घटनेने पुणेकरांची चिंता वाढवली आहे.
डुकरांच्या मृत्यूमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील आणखी एकाचा GBS मुळे मृत्यू
पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने बुधवारी मृत्यू झाला. मृत व्यक्ती कर्वेनगरमधील रहिवासी होती. 28 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते.
( नक्की वाचा : Mumbai Pune Expressway वरील वाहतुकीत मोठा बदल, 6 महिन्यांसाठी 'हा' एक्झिट मार्ग राहणार बंद! )
'जीबीएस' ची कारणे आणि उपाय
'जीबीएस' होण्याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, परंतु दूषित पाण्यातील जीवाणूंमुळे याचा प्रसार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे आणि स्वच्छता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.