- अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील तीन मंदिरं जतन आणि संवर्धनासाठी तात्पुरती बंद ठेवली जाणार आहेत
- या मंदिरांचे काम १० मे ते ९ जून २०२६ पर्यंत सुरु राहील आणि या काळात दर्शनासाठी बंद राहतील
- पुरातत्त्व विभागाच्या निधीतून गाभारा आणि सभामंडपाचे काम केले जाणार आहे
गणेशभक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अष्टविनायकातील 3 मंदिरं दर्शनासाठी बंद रहाणार आहेत. अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामांसाठी ही मंदिरं बंद ठेवण्यात येणार आहेत. यात मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिराचा समावेश आहे. ही मंदिर 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मूळ पौराणिक स्वरूप जपण्यासाठी गाभारा आणि सभामंडपाचे विशेष दगडी काम केले जाणार आहे. त्यामुले याकाळात मंदिरात दर्शन होवू शकणार नाही.
पुरातत्त्व विभागाचे नियोजन
शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून या मंदिरांची दुरुस्ती केली जात आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिरे बंद ठेवण्याचा प्रस्ताव सह धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टनेही या निर्णयाला पाठिंबा दिला असून तसा ठराव मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते. तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी 7 मे 2026 रोजी मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरं जरी भाविकांसाठी बंद असली, तरी आतील नित्य पूजा आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. मात्र, मंदिर परिसरात पुजारी आणि अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Pune News: एक चुक नडली अन् 7 जण लिफ्टमध्ये अडकले, 3 तास बचावासाठी धडपड, अखेर...
सध्या या तिन्ही ठिकाणी मुख्य मंदिर आणि परिसराचे काम प्रगतीपथावर आहे. दगडी बांधकामाचे संवर्धन करताना भाविकांची उपस्थिती अडथळा ठरू शकते, म्हणून ही तात्पुरती बंदी असेल. यासंदर्भात आज 8 मे रोजी ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मंदिराचे विश्वस्त, पुजारी आणि संबंधित अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मंदिराची सुरक्षा आणि भाविकांच्या भविष्यातील सोयीसाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.